मुंबई - राज्यात कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव असल्याने पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रखडलेल्या आहेत. तरी आज आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आपल्याकडील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षेला सुरूवात केली. कोरानाची धास्ती असतानाही पहिल्याच दिवसाच्या लेखी पेपरला तब्बल ९५ टक्के विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
विद्यापीठाकडून आज उन्हाळी सत्राच्या पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा वगळता पदव्युत्तर दंत, आयुर्वेदिक, युनानी, समचिकित्सा, नर्सिंग, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष विज्ञान आदी विषयांच्या लेखी परीक्षेला सुरूवात केली असून ती २३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
राज्यभरात ही परीक्षा आज ११५ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली.
परीक्षा केंद्रावर सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशन व लिक्विड सॅनीटायझरचा वापर करण्यात आला. विद्यापीठाकडून या परीक्षेचे सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे निरीक्षण करण्यात आले होते. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मास्क लावून तसेच सॅनेटायझरची व्यवस्था केली होती. तर पदव्युत्तरच्या अनेक शाखांना विद्यार्थ्यांची संख्या ही कमी असल्याने या परीक्षा आम्हाला आयोजित करता आल्याचे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले.
पदव्युत्तरच्या दंत, आयुर्वेदिक, युनानी, समचिकित्सा, नर्सिंग, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 7000 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज सादर केले होते. ही परीक्षा 23 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार असून त्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील. तर नियोजित वेळापत्रकानुसार 25 ते 31 ऑगस्ट या कालावधीत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यासाठीचे सर्व साहित्य परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यात आले असून ही परीक्षा राज्यभरातून 2 हजार 250 पेक्षा अधिक विद्यार्थी देणार असल्याची माहितीही डॉ. पाठक यांनी दिली.