मुंबई : एसटी महामंडळाच्या शासनात विलीनीकरणाच्या मागणीवरून आझाद मैदानात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात जोरदार निदर्शने केली. यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर, किरीट सोमैया, गोपीचंद पडळकर यांनीही तिथे दाखल होत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. याशिवाय राज्यातही विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. तर मुख्यमंत्र्यांनी संपकरी आणि राजकीय पक्षांना सहकार्याचे आवाहन केले.
ठाकरे सरकार जोपर्यंत एसटी महामंडळाला विलीनीकरणाचे लेखी आश्वासन देत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. तर जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई आम्ही सोडणार नाही असे गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले. किरीट सोमैयांनीही शेवटपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहू असे म्हटले आहे. आमदार रवी राणा यांनी अमरावतीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी गंभीर असून कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राजकीय पोळी भाजू नका असे आवाहनही त्यांनी राजकीय पक्षांना केले आहे.
परब यांचा सवाल
भाजप एसटीचा संप भडकाविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर घेतील का असा सवाल परब यांनी विचारला आहे.
काँग्रेसची भूमिका
एस टी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असले तरी सहनुभूतीपूर्व मार्ग निघावा ही काँग्रेसची भूमिका आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
बस स्थानकांवर खासगी वाहने
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी ट्रॅव्हल्सना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे, सांगलीसह अनेक ठिकाणी बस स्थानकांवर खासगी ट्रॅव्हल्स आणि वाहने उभी राहिल्याचे चित्र बघायला मिळाले.
न्यायालयाचे निर्देश
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या अवमान याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी अवमान याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने कामगार संघटनांना दिले आहे. 343 जणांविरोधात नोटीस जारी करण्यात आली आहे.