मुंबई - एसटीचा संपात (ST Workers Strike) सर्व निलंबित कर्मचाऱ्यांना एक संबंधी महामंडळाकडून देण्यात आली होती. मात्र, ही संधी काल संपली असून आता एसटी महामंडळाने कठोर भूमिका घेत निलंबित कर्मचाऱ्यांना दणका देणे सुरु केले आहे. आज एसटी महामंडळाने २३० निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीची (Dismissal of ST Workers) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याशिवाय आज ३८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून आता निलंबित कर्मचाऱ्यांचा आकडा १० हजार ३७० वर गेला आहे.
बडतर्फीची कारणेदाखवा नोटीस देण्यास सुरुवात -
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार,आज राज्यभरात २१ हजार ६४४ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे. तर प्रत्यक्ष एसटी संपात ६७ हजार ९०४ कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. तसेच संपामुळे राज्यभरातील २५० एसटी आगारापैकी १२२ आगारातून एसटी बसेस धावत होत्या. तर १२८ आगार अजून बंदच आहेत. याशिवाय १० हजार १८० निलंबित कामगारांना सोमवारपर्यत शेवटची संधी देण्यात आलेली होती. त्यातून फक्त सोमवारी १४९ निलंबित कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणेदाखवा नोटीस महामंडळाकडून देण्याची सुरुवात केली आहे. आज एसटी महामंडळाने राज्यभरातील निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी २३० बडतर्फीची कारणेदाखवा नोटीस देण्यात आली आहे.
इतिहासात पहिल्यांदाच मोठी कारवाई -
एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. तब्बल ४० दिवस होऊन सुद्धा एसटीचा संप सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने जोरदार कारवाई सुरु केली आहे. महामंडळाने कर्तव्यावर रुजू न हाेणाऱ्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई सुरु केली.महामंडळाने आतपर्यत राेजंदारीवरील २ हजार ३१ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून १० हजार ३७० कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय २ हजार ५७२ कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहे. एसटी महामंडळाचा ६० वर्षाचा इतिहासात पहिल्यांदाच येवढी मोठी कारवाई केल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एसटीचे नुकसान
राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ केली. मात्र, कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. संप सुरूच ठेवण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे, एसटी महामंडळाकडून कारवाई सुरूच ठेवण्यात आली असून आज तब्बल १९२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. तर, १ हजार ९८० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. एक महिन्याहून अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे राज्यात ४५० कोटींचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच; आतापर्यंत ९३८४ कर्मचारी निलंबित तर, १९८० जणांची सेवासमाप्ती