मुंबई - अंथरुणाला खिळून असणाऱ्या रुग्ण, व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर लसीकरण केले जाणार आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत हा निर्णय घेण्यात आला असून, नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
गंभीर आजारी असणाऱ्या व्यक्तींसाठी लसीकरण सुविधा
राज्यात ज्या ठिकाणी घरात अंथरूणाला खिळून असलेले रुग्ण, व्यक्ती आहेत. ज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे आहे, त्यांच्यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जी व्यक्ती अंथरुणाला खिळून आहे, तसेच, पुढील सहा महिने परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता असेल, अशा व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी ही विशेष सुविधा आहे.
येथे नोंदवा नावे
व्यक्तींची नावे व पत्ता, संपर्क क्रमांक, तब्येत ठीक नसल्याचे कारण. तसेच, सदरची व्यक्ती लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, इत्यादी माहिती (covidvacc2bedridden@Gmail.com)या ईमेलवर पाठवण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जेणेकरून अशा व्यक्तींचे लसीकरण पथकामार्फत करणे सोयीचे होईल. ही व्यक्ती लसीकरणास पात्र असल्याचा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ञांचा दाखला, तसेच या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तींने लसीकरणासाठीचे संमतीपत्र या माहितीसोबत जोडणे आवश्यक आहे, असेही आरोग्य विभागाने आपल्या नियामांत नमूद केले आहे.