मुंबई - राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण तापले आहे. मनसेने मशिदीवरील भोंग्यांतून तर भाजपने हिंदुत्वाच्या विषयांवरुन शिवसेनेला डिवचले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे उट्टे काढण्यासाठी आणि मनसे - भाजपला टक्कर देण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. येत्या १४ मे ला मुंबईत शिवसेनेची सभा होणार असून यासाठी सेनेकडून व्यूहरचना आखण्यात येत आहे.
मनसेचा नवा अंक राज्यातील सत्तांतरानंतर - शिवसेना-भाजप या दोन पारंपरिक मित्रांमध्ये वितुष्ट आले. तर ज्यांच्या विरोधात लढत राज्यात आणि महापालिकेत वर्षानुवर्ष सत्ता उपभोगली. त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला सत्ता स्थापन करावी लागली. राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपकडून कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. हिंदुत्व सोडल्याची शिवसेनेवर सातत्याने जोरदार टीका केली जात आहे. मनसेला पर्याय म्हणून शिवसेनाच्या विरोधात उभे केले जात आहे. मनसेने ही हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारत राजकारणांचा नवा अंक सुरू केल्याने कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेला हा हादरा मानला जातो आहे.
शिवसेनेची कशी असेल रणनीती - बेस्टच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ललकारत आपण मास्क काढून लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचे म्हणाले होते. आता तारखाही पुढे आल्या आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या वादावर आणि हनुमान चालीसा, तसेच हिंदुत्वावर विरोधकांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मात्र शिवसंपर्क शुभारंभ सभेत सौ सोनार की एक लोहार की देण्यासंदर्भात रणनीती शिवसेनेकडून आखण्यात येत आहे. विशेषतः मनसेच्या नव्या भूमिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून जाहीरपणे आपली भूमिका मांडणार आहेत.
भाजप-मनसेच्या सभांवर परखड भाष्य - पक्षप्रमुख ठाकरे हे भाजपचे हिंदुत्व बेगडी असून शेंडी आणि जाणव्याचे आहे. परंतु, शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी आहे, असा उल्लेख सातत्याने करतात. नुकतेच शिवसेनेचे हिंदुत्व गदाधारी असल्याचे सांगत त्यांनी भाजपला फटकारले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या विधानावर गदा नसून गधा अशी कोटी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यावरून फडणवीसांवर निशाणा साधण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी भाजपची पोलखोल तर मनसेची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. यातील मुद्द्यांवर ठाकरे परखड भाष्य करतील, असे मत राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार अरविंद सुर्वे यांनी व्यक्त केले.
शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन - राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने काहीशी मवाळ भूमिका घेतली होती. विरोधकांकडून त्याची टिंगल उडवली गेली. शिवसेनेचे मांजर झाले, अशा प्रतिक्रिया सोशल माध्यमातून उमटल्या. भाजपने देखील शिवसेनेवर चाल करून जाण्याचे प्रयत्न केला. दिवाळीत भाजपने शिवसेना भवन येथे धडक देण्याचा इशारा दिला. त्यामुळे शिवसैनिक संतापले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची पळता भुई थोडी केली. तर खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर केलेल्या आरोपावेळी दादर येथील शिवसेना भवन येथे तर राणा दाम्पत्याने मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. सोमय्यांच्या गाडीवर हल्ला केला. हीच ताकद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत पाहायला मिळणार आहे.
एकेकाळचा पारदर्शक कारभार, आता भ्रष्टाचारी वाटतो का.? - गेली २५ वर्षे शिवसेना मुंबई मनपामध्ये सत्तेत आहे. भाजपने २० वर्षे शिवसेनेसोबत अनेक समित्यांवर अध्यक्ष पदाचे दावेदार होते. परंतु, २०१७ च्या निवडणुकीत संख्याबळ वाढल्याने भाजपला मनपामध्ये सत्ता स्थापनेचे वेध लागले. शिवसेनेची साथ सोडून पहारेकऱ्यांची भूमिका पत्करली. मात्र प्रस्ताव मंजूर करताना भाजपची दुटप्पी भूमिका सातत्याने पाहायला मिळाली. आता मनपातील घोटाळ्यांची मालिका भाजपने काढायला सुरुवात केली आहे. सत्तेत असताना पारदर्शक असलेल्या मुंबई मनपाचा कारभार भाजपला आता भ्रष्टाचारी वाटू लागला आहे का.? भाजपने याचा खुलासा करायला हवा. सोयीचे राजकारण भाजपने सोडून द्यावे. मुंबईकर आता तुम्हाला पुरते ओळखून चुकले आहेत, असे टोला शिवसेनेचे उपशाखा प्रमुख राजन नाडर यांनी लगावला आहे.