मुंबई - मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा वादाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात पुन्हा एकदा कबरीवरुन धार्मिक वाद उफाळून आला होता. त्यानंतर किष्किंदाचे दंडास्वामी श्री गोविंदानंद सरस्वती महाराज यांनी हनुमानाच्या जन्मास्थळाबाबत वाद निर्माण केला आहे. हनुमानांचे जन्मस्थळ त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी नसून किष्किंदा येथे असल्याचा दावा गोविदानंद सरस्वती महाराज यांनी केला आहे. किष्किंदा येथे हनुमानाचे भव्य मंदिर उभारण्याची घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र त्यांचा हा दावा नाशिकच्या साधू आणि महंतांनी फेटाळला आहे. त्यामुळे हनुमान जन्मस्थळावरुनही राज्यातील राजकारण चांगलंच तापणार आहे.
औरंगजेबाच्या कबरीचा वाद - एमआयएमचे नेते तथा तेलंगाणातील आमदार अकबरुद्दीन ओवेसी आणि एमआयएमचे खासदार इमतियाज जलील यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले अर्पण केली होती. यानंतर अनेक स्तरावरून या कृतीबाबत टीका करण्यात आली. या नंतर पुन्हा एकदा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा बाहेर आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी तर महाराष्ट्रात ही कबर कशाला हवी? असा सवाल करत कबर तोडण्याचा इशारा दिला. तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली. या कबरीच्या मुद्द्यावरून सातत्याने महाविकास आघाडी सरकारला डिवचण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाला. या कबरीबाबत महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेले पाहता, औरंगजेबाची कबर पाच दिवस पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. मात्र हे सर्व प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा ही कबर पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे.
अफजल खानच्या कबरीला फंडिंग ? - प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची कबर आहे. या कबरीच्या जागेचा विस्तार आणि देखरेख करण्यासाठी विदेशातून फंडिंग केली जाते, असा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. 22 मे ला झालेल्या पुण्याच्या सभेत राज ठाकरे यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर अफजलखानाच्या कबरीचाही वाद निर्माण होण्याची शक्यता होती. यामुळे औरंगजेबाच्या कबर परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. रॅपिड ऍक्शन फोर्स या कबरीच्या सुरक्षेसाठी लावण्यात आल्या. परिसरात जातीय तणाव निर्माण होऊ नये, याची विशेष खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली होती. अफजल खानाच्या कबरीसाठी विदेशी फंडिंग केली जाते, अशा बाबतची कोणतीही बाब समोर आलेली नाही.
पुण्यातील बडा शेख आणि छोटा शेख दर्गा वाद - पुण्यातील बडा शेख आणि छोटा शेख दर्गा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरं उद्ध्वस्त करून बांधल्याचा दावा केला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा वाद सुरू आहे. पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी हा दावा केला असून पुणे महापालिका आणि पुरातत्त्व विभागाला याबाबत पत्रही लिहिले आहेत. औरंगजेबाने पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिर उद्ध्वस्त केली. त्यानंतर मंदिराच्या जागी दर्गे बांधण्यात आले. कुंभारवाड्यातील मंदिराच्या जागेवर बांधण्यात आलेल्या दर्ग्याला ‘छोटा शेख दर्गा’, तर नारायणेश्वराच्या जागेवर बांधण्यात आलेल्या दर्ग्याला ‘बडा शेख दर्गा’ असे नाव देण्यात आल्याचा दावा अजय शिंदे यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात धार्मिक मुद्द्यांवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील बेकायदेशीर भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्यावरून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच राणा दाम्पत्याने देखील हनुमान चालीसाचा मुद्दा बाहेर काढत मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा प्रयत्न केला. त्यातही राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. अद्यापही तो वाद सुरू आहे. राज्यामध्ये भोंगे आणि हनुमान चालीसाचा मुद्दा एवढा संवेदनशील असून, याला सामान्य जनतेने अधिकच महत्त्व दिले नाही. त्यामुळेच राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले. राज्यात असलेल्या सर्व समाजातील लोकांनी संवेदनशील मुद्द्यावर दाखवलेल्या सामंजस्याचेही त्यांनी कौतुक केले.
वाद निर्माण करण्याचा प्रयत्न? - भोंगे आणि हनुमान चालिसाच्या मुद्दानंतर आता कबरीचा मुद्दा समोर काढून राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे का? असा प्रश्न नक्कीच उभा राहतो. मात्र सध्या जनतेसमोर असलेले महागाई बेरोजगारी सारखे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांकडून धार्मिक वाद जरी निर्माण केले जात असले, तरी जनता त्याला अधिकच महत्त्व देत नाही. आताही धार्मिक स्थळ आणि कबर या मुद्द्यावरून राजकारण तापलेले पाहायला मिळाले. मात्र कबर या ऐतिहासिक आहेत. त्यांची जबाबदारी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे असते. त्यामुळे राज्याचा थेट हस्तक्षेप तेथे नसतो. सध्याची परिस्थिती पाहता राज्यातील जनतेमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची चिन्हे नाहीत, असे मत राजकीय विश्लेषक प्रविण पुरो यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.