मुंबई - राज्यातील १८ महापालिका, १६४ नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुका या दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी करायला सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला भरघोस यश मिळावे यासाठी पक्षांकडून स्थानिक पातळीवर बांधणी सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी खास करून राष्ट्रवादी काँग्रेसने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. आता स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी नेत्यांचे दौरे - स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला भरघोस यश मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते मैदानात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि राजेश टोपे यासारखे नेते स्थानिक पातळीवर दौरे करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सध्या राज्यभर दौरा करत आहेत. यावेळी बीड, उस्मानाबाद, लातूर नांदेड, हिंगोली येथे स्थानिक पातळीवर सभा आणि कार्यक्रमाचा धडाका त्यांच्याकडून लावण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागातील दौरा जयंत पाटील लवकर करणार आहेत. याआधीही महाविकास आघाडी सरकार असताना राज्यभर राष्ट्रवादी संवाद यात्रा काढण्यात आली होती.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांना लक्षात घेऊन दौरे करत आहेत. काल सातारा येथे अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत दौरा केला. तेथील कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना मार्गदर्शन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी तसेच प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचे कार्यक्रम राष्ट्रवादीकडून आखले जात आहेत.
स्वबळावर निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना - राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या एकत्र मिळून लढाव्या त्याबाबत विचार सुरू होता. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासोबत निवडणुकांमध्ये आघाडी करायची किंवा नाही याबाबत अंतिम निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाणार होता. मात्र वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबत सहमती दर्शवली होती. खुद्द शरद पवार यांनीही महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र सध्या राज्यात सत्तांतर झाले. या सर्व राजकीय नाट्यांमध्ये बरेच पाणी पुलाच्या खालून वाहून गेले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत आघाडी होईल, याबाबत कार्यकर्त्यांनी विचार करू नये. स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी कार्यकर्त्यांनी करावी. अशा सूचनाच अजित पवार यांनी साताऱ्याच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आधी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरे जाणारी राष्ट्रवादी काँग्रेस आता स्वबळावर या निवडणुका लढवण्याची तयारी करत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश - राज्यातील 17 जिल्ह्यातील 608 ग्रामपंचायत च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये 173 ग्रामपंचायतीवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष राहिला. ही बाब खुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे. भारतीय जनता पक्ष ग्रामपंचायतच्या निवडणुकीत प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा शरद पवार यांनी फेटाळला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला भरघोस यश मिळाले असल्याचे शरद पवार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजून आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, महानगरपालिका निवडणुका यासाठी पक्ष पूर्णतः तयार आहे. या निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री असताना अजित पवारांची बांधणी - राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी आपल्या पक्षाला बळ देण्याचे काम केले आहे. काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भरघोस निधी अर्थमंत्री म्हणून अजित पवार देत असल्याचा आरोप सातत्याने केला होता. अजित पवारांनी राज्यात सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला बळकटी देण्याचा काम केले आहे. सार्वजनिक हिताची कामे करण्यासाठी स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना आर्थिक सहाय्य लाभल्याने राष्ट्रवादी काँग्रेस सध्या ग्रामीण भागात अधिक मजबूत होताना दिसतेय. याचाच प्रत्यय ग्रामपंचायत निवडणुकीत देखील पाहायला मिळाला. त्यामुळे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळेल अशी आशा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना असल्याचं मत राजकीय विश्लेषक प्रवीण पूरो यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.