मुंबई - विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तात्काळ घ्यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. त्यानुसार आज विधानसभा अध्यक्षपदाचा निवडणूकीविषयी महाविकास आघाडी सरकारकडून निर्णय घेतला जाऊ शकतो. नुकतीच विधानसभा अध्यक्षपदाचा चर्चेसाठी विधानभवनात बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे संग्राम थोपटे हेच विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडले जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संग्राम थोपटे हे पक्षासाठी काम करत आहेत. मात्र, त्यांना कोणतेही मंत्रिपद न दिल्याने नाराज होते. त्यामुळे नाराज संग्राम आता विधानसभाध्यक्ष होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महाविकास आघाडी समान कार्यक्रमात काँग्रेस पक्षाकडे विधानसभा अध्यक्षपद आहे, त्यामुळे निवडणूक तातडीने घेण्याची भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली. नाना पटोले यांनी महिन्याभरापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, विधानसभा अध्यक्षांची खुर्ची अद्यापही रिकामीच आहे. त्यामुळे याच अधिवेशनात ही निवडणूक घेऊन अध्यक्ष करणार असल्याचे ही सांगितले जात आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा होती. त्यातच काँग्रेस कडून आणि महा विकास आघाडी कडून संग्राम थोपटे यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे आज किंवा उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे.
थोपटेंना मंत्रिपद देण्यात आले नव्हते -
राज्यात महाविकास आघाडीचे सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदे जाहीर करण्यात आली होती. संग्राम थोपटे यांची वर्णी मंत्रीपदासाठी लागेल अशी थोपटे यांच्या कार्यकर्त्यांची आशा होती. मात्र, थोपटे यांचे नाव मंत्री पदाच्या यादीत न आल्याने त्यांच्या समर्थकांनी पुण्यात मोठा राडा केला. थोपटे समर्थकांनी आक्रमक होत थेट पुण्यातील काँग्रेस भवनाचीच तोडफोड केली. त्यामुळे संग्राम थोपटे हे राज्यभरात चर्चेत आले. मात्र, त्यावेळी थोपटे यांनी हात झटकत मला या तोडफोडीची माहिती नसल्याची सारवासारव केली होती.