मुबंई - तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने वादळी वारे आणि मुसळधार पावसाने मुंबईसह कोकण किनारपट्टीला झोडपून काढले. या वादाळाच्या तडाख्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. तर अनेक ठिकाणी झाडांची पडझड आणि घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या वादळात घाटकोपर पूर्वेतील कामराज नगर एका दुकानाचे पत्रे उडून गेल्याने दुकानीतील जीवनाश्यक वस्तूंचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याची एक घटना समोर आली आहे.
सोमवारी दुपारपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला, तसाच वादळी वाऱ्यामुळे कामराज नगर येथील कमलाकांत शंकर शिंदे यांच्या दुकानाचे पत्रे उडून गेले. त्यात वरून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे दुकानातील सर्व जीवनाश्यक वस्तू व इतर सर्व साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधिच लॉकडाऊन असल्याने लहान लहान व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यात आता तौक्ते वादळाने शिंदे यांना या नुकसानीला सामोरे जावे लागले.
या वादळात शिंदे यांच्या दुकानाचे नुकसान तर झाले आहेच, मात्र, सुमारे ७० हजार रुपयांच्या मालाची नासधुस झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने या नुकसानीची पाहणी करून भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांसह दुकान व्यावसायिक शिंदे यांनी केली आहे. शिंदे यांच्यासह अनेक जणांच्या घरांचेही नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.