मुंबई - अरबी समुद्रात निर्माण झालेले तौक्ते चक्रीवादळ आता संथपणे गुजरातच्या दिशेने सरकत आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला या चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. चक्रीवादळामुळे एकूण ६ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले आहेत. आज (१७ मे) दिवसभर मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे कोसळली आहेत. त्यामुळे घरांचेदेकील नुकसान झाले आहे. तर रायगडमध्ये या चक्रीवादळाने तीन जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान, निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असून, मदतकार्य वेगाने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
चक्रीवादळाने सोमवारी मुंबईलाही तडाखा दिला. चक्रीवादळाच्या प्रभावाने मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्माळून पडली आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने, तसेच रेल्वे मार्गावर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी १० वाजल्यानंतर वरळी- वांद्रे सी-लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मुंबई विमानतळावरील सर्व विमानांची उड्डाने रात्री 8 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे मुंबईतील ३ कोविड केंद्रातील रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले.
वादळी वाऱयासह पाऊस आणि त्यात दुपारी ३:४४ वाजता समुद्राला भरती आल्याने, समुद्र लगतच्या भागांना लाटांचा तडाखा बसला. वाऱ्याचा वेग ताशी 114 किलोमीटर इतका प्रचंड असल्याने गेट- वे ऑफ इंडिया, नरीमन पॉइंट, दादर चौपाटी, जूहू येथील समुद्र किनाऱ्यांवर प्रचंड लाटा उसळल्या. खवळलेल्या समुद्रामुळे या परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ: मुंबईत ताशी ११४ किलोमीटर वेगाने वाहिले वारे
रत्नागिरीत घरांचे नुकसान, पंचनामे सुरू
रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी घरांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सध्या या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. तर, काही ठिकाणी नागरिकांनी स्वतः उन्मळून पडलेली झाडे बाजूला केली आहेत. जिल्ह्यात वीजपुरवठा देखील खंडीत असून, पूर्वपदावर आणण्याचे काम सध्या सुरू आहे.
सिंधुदुर्गात दोन बोटी वाहून गेल्या
तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गच्या किनाऱ्याला मोठा फटका बसला आहे. देवगडच्या आनंदवाडी बंदरात नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्या आहेत. या अपघातात एका खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर, तीन खलाशांचे या घटनेत प्राण वाचले आहेत. किनारी भागात झाडे कोसळल्याने खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 748 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. किनारपट्टीवरच्या एकूण 144 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले होते. तर 447 घरांचे नुकसान झाले आहे.
रायगडमध्ये चक्रीवादळाने घेतला तिघांचा जीव
रायगड जिल्ह्यात 17 मेच्या मध्यरात्रीपासून तौक्ते चक्रीवादळ समुद्रात येऊन धडकले होते. चक्रीवादळामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच 1,886 घरांचे अंशतः तर पाच घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. तसेच दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी महावितरणच्या पोलचे व एका ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे. दरम्यान, चक्रीवादळ काळात कोविड रुग्णांच्या उपचारावर कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला तडाखा, मुसळधार पावसाने झोडपले; वाहतुकीवर परिणाम