मुंबई : मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा होऊ लागला आहे. दिवसाला 8 ते 11 हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी महापालिकेने 6 नोडल म्हणजेच समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे समन्वय अधिकारी ऑक्सिजन पुरवठादार, सहाय्यक आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यात समन्वय राखण्याचे कामकाज पाहतील, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.
कोरोना वाढला
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. हा प्रसार कमी होत असतानाच लॉकडाऊनमध्ये पूर्णत: सूट देण्यात आली होती. रेल्वेने सामान्य प्रवाशांना सूट देण्यात आली. मार्केट, मॉल आदी ठिकाणी खरेदीसाठी गर्दी होऊ लागली. हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार आदी ठिकाणीही गर्दी होऊ लागली. कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. कोरोनाचे रोज 8 ते 11 हजार नवे रुग्ण आढळून येत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सध्या मुंबईत 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू आहे.
आढावा बैठक
मुंबईतील कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखण्याबाबत राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी हे 6 समन्वय अधिकारी ऑक्सिजन पुरवठादार, सहाय्यक आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यात समन्वय राखण्याचे कामकाज पाहतील, अशी माहिती आयुक्त चहल यांनी ही माहिती दिली.