मुंबई - नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्याकडून 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटलेल्या या सर्व आरोपीना मुंबई पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पोस्ट सोशल माध्यमांवर शेअर केल्या प्रकरणी या आरोपींनी नौदलाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली होती.
नौदलाच्या अधिकाऱ्याला मारहाण करणारे सहा आरोपी हे शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याने यावर विरोधकांनी मोठी टीका केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याचे भाजपाने म्हटले आहे.
हेही वाचा-खूशखबर ! सणासुदीच्या काळात फ्लिपकार्ट देणार १ लाख ७० हजार नोकऱ्या
सुरुवातीला सहा आरोपींना पोलिसांनी तात्काळ जामीन मंजूर केला. त्यामुळे विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांचे कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, या आरोपींवर आणखी काही कलमे लावून कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार समता नगर पोलीस ठाण्यात या आरोपींवर कलम 452 (अतिक्रमण करून हल्ला करणे ) लावून अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा-दिलासादायक वृत्त.. 'ही' कंपनी देणार ३० हजार हंगामी नोकऱ्या
शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम, संजय मांजरे, राकेश बेलनकार, प्रताप वीरा, सुनील देसाई व राकेश मुळीक अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यावर राज्यपालांनी कारवाई करण्याचे शर्मा यांना आश्वासन दिले आहे.