मुंबई - सीएसएमटी येथील पुलाच्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच सायन येथील पुलाचा काही भाग गुरुवारी रात्री कोसळला. या पुलाचे काम येत्या २० एप्रिलपासून केले जाणार आहे. त्यासाठी २० एप्रिलपासून पुढील दोन महिने सायन पूल बंद ठेवला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.
गोवा किंवा पनवेल येथून मुंबईत येताना सायन मार्गे यावे लागते. त्यासाठी सायन पुलाचा वापर करावा लागतो. सायन पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबई मार्फत करण्यात आले होते. आयआयटीच्या अहवालात उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार, रस्ते विकास महामंडळाने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. वाहतूक नियोजनासाठी मुंबई वाहतूक पोलिसांबरोबर बैठका पार पडल्या. त्यानंतर या पुलाचे बेअरिंग तातडीने बदलण्यासाठी २० एप्रिलपासून काम हाती घेतले जाणार आहे. गुरूवारी रात्री सायन सर्कल येथील पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील पुलाचा काही भाग कोसळला. संध्याकाळच्या वेळी लोकांची या ठिकाणी अधिक वर्दळ नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सीएसएमटी पुलाच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती नको म्हणून या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.
१७० बेअरिंग बदलणार
उड्डाणपुलाला एकूण १७० बेअरिंग असून दोन महिन्याच्या कालावधीत ते पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. २० एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या कालावधीत उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्ण बंद राहणार आहे. वाहनचालकांनी उड्डाणपुलाखालील रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.
वाहतूक कोंडीची समस्या गंभीर
लोअरपरळ स्थानकाजवळील डिलाईड रोड पूल धोकादायक झाल्याने बंद करण्यात आला. तर मुंबई शहर व उपनगरातील अनेक पूल पाडण्यात आले असून अजून ७ पूल पाडण्यात येणार आहेत. त्यात आता मुंबई शहराला जोडणारा सायन येथील पूल दुरुस्तीसाठी दोन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होणार आहे.