मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम उपनगरातील सुप्रसिद्ध अंधेरीचा राजाचे आगमन व विसर्जनही यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय आझाद नगर उत्सव समितीने घेतला आहे. दरवर्षी 8 फुटांची गणेशाची मूर्ती असते, मात्र यंदा गणेशाची मूर्ती ही 4 फुटांची ठेवण्यात आली आहे. तर यंदा अंधेरीचा राजा गणपती स्वर्गातील देखाव्यात विराजमान होणार आहे.
दरवर्षी मोठया प्रमाणात बॉलिवूड सेलिब्रिटी व लाखो भाविक अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत साधेपणाने यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदा पहिल्यांदाच अंधेरीच्या राजाची आगमन व विसर्जन मिरवणूक निघणार नाही, अशी माहिती मंडळाचे प्रवक्ते उदय सालीयन यांनी दिली.
गर्दी टाळण्यासाठी व भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी खुल्या मंडपात हायड्रोलिक लिफ्ट लिस्टवरची मूर्ती विराजमान असणार आहे. लांबून बाप्पाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य समितीच्या वतीने 14 दिवस रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
दरवर्षी अंधेरीच्या राजाचे विसर्जन हे संकष्ट चतुर्थीला हजारो भक्तांच्या उपस्थित वाजतगाजत मिरवणुकीनंतर दुसऱ्या दिवशी वर्सोवा समुद्रकिनारी केले जाते. मात्र यंदा मिरवणूक न काढता विसर्जनासाठी जवळच मंडळाने कृत्रिम तलाव तयार केला आहे.त्यात अंधेरीच्या राजाचे विसर्जन होईल, तसेच सदर कृत्रिम तलावात इतर घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जनही करता येणार आहे.