मुंबई - भारतीय वन संरक्षण विभागाने जानेवारी २०२२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०१९ च्या तुलनेत मुंबईतील कांदळवन घटत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधानपरिषदेत आपल्या लेखी उत्तरात दिली. शिवसेनेच्या सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. उपगरात कांदळवन क्षेत्रांमध्ये १.८ चौरस किलोमीटर इतकी घट झाली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील समुद्र किनाऱ्यांसह नदी आणि खाड्यांजवळ असलेल्या कांदळवनाच्या जंगलापैकी २० टक्के कांदळवन हे जंगलात भराव टाकल्यामुळे नष्ट होत असल्याचा आरोप मनीषा कायंदे यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी कांदळवनाचा ऱ्हास होऊ नये, याकरता कांदळवन संरक्षणासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. कांदळवन क्षेत्राचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने २०१२ पासून स्वतंत्र कांदळवन कक्ष स्थापण करण्यात आला आहे.
राखीव वन म्हणून घोषित
शासकीय जमिनीवर असलेले एकूण १६८८४.९४०५ हेक्टर क्षेत्र भारतीय वन अधिनियमनुसार राखीव वन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच इतर कांदळवन क्षेत्रापैकी ११५४८.३३ हेक्टर क्षेत्र उपरोक्त अधिनियमाच्या कलम २० अन्वये अंतिमतः राखीव करण्यात आले आहे. कांदळवन क्षेत्रावर सुमारे १९११.३३ हेक्टर क्षेत्रामध्ये कांदळवनाचे वनीकरण करण्यात आले आहे. कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना या योजनेची २०१७ पासून अंमलबजावणी करण्यात येत असून त्यासाठी स्थानिक लोकांना कांदळवन संरक्षणासाठी समाविष्ट करून घेण्यात आले आहे. कांदळवन क्षेत्राचे संरक्षण व संवर्धन करण्याकरता महाराष्ट्र सुरक्षा बल मंडळ यांच्याकडील १५६ सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले आहे. कांदळवन क्षेत्रातील जवळपास आठ हजार बेकायदेशीर बांधकामे कांदळवन कक्षाकडून नष्ट करण्यात आलेली असून मुंबई व नवी मुंबईतील कांदळवनाच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
हेही वाचा - Maha New Holi Guideline : होळीसाठी शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना