मुंबई - कोरोनामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरे आजपासून भाविकांसाठी खुली झाली आहेत. राज्यभरातील सर्वच मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मुंबईच्या प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरदेखील भाविकांसाठी खुले करण्यात आले. बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मंदिराबाहेर रांगा लावल्या आहेत. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे.
भाविक दर्शन घेऊन समाधानी -
जवळपास सात ते आठ महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे पुन्हा खुली करण्याची परवानगी शासनातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची काळजी घेण्यासाठी सोयी करण्यात आल्या आहेत. आज अनेक महिन्यांनी मंदिरात येऊन बाप्पांचे दर्शन घेतल्याने समाधानी असल्याचे भाविकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
हेही वाचा - विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरुवात; चेन्नईतील भक्तांना मिळाला सर्वप्रथम दर्शनाचा मान
क्यूआर कोडची व्यवस्था -
सिद्धीविनायक मंदिर खुले करण्याचा आजचा पहिला दिवस. सगळे नियमाप्रमाणे सुरू करण्यात आले आहे. मंदिराबाहेर क्यूआर कोडची व्यवस्था आहे. ते घेऊनच आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. तसेच ठराविक वेळेनंतर मंदिर आणि परिसर सॅनिटाइझ करण्यात येत आहे. मंदिरात तासाला १०० भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे.
भविष्यात भाविकांची संख्या वाढवणार -
आज दिवसभरातील भाविकांची संख्या, सोयी-गैरसोयी, पुरवण्यात येणाऱ्या सुविधा, भाविकांची ऑनलाइन बुकींग या सर्व बाबींचा आढावा घेऊन नंतर भाविकांची संख्या वाढवणार, अशी माहिती सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ईटीव्ही भारतला दिली.
हेही वाचा - अंबाबाई मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले; भाविकांची प्रचंड गर्दी