मुंबई - कोरेना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबईत गर्दी होणाऱ्या भागातील ५० टक्के दुकाने दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या निर्णयाला प्रतिसाद देत दादर येथील दादर व्यापारी संघटनेने एक दिवसाआड नाही तर गुढीपाडव्यापर्यंत या भागातील 900 पेक्षा जास्त दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जी-नॉर्थचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दादर, माहीम आणि धारावीतील रस्त्यांची निवड करून त्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, दादर येथील दुकानदारांनी गर्दी टाळण्यासाठी एकत्र एकदिवसाआड नाहीतर गुढीपाडव्यापर्यंत पूर्ण दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दादरसारख्या सतत गजबलेली बाजारपेठेत आजपासून शुकशुकाट होणार आहे.
कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना राबवताना दिसत आहे. त्याच अनुषंगाने दादर परिसरात मोठी गर्दी होती. ही टाळण्यासाठी दादर परिसरातील दुकाने एकदिवसाआड बंद करण्याचे निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आम्ही एकदिवसाआड नाही तर गुढीपाडव्यापर्यंत दुकाने बंद करण्याचे आमच्या दादर व्यापारी संघाने ठरवले आहे. यामुळे नक्कीच गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. 900 पेक्षा जास्त दुकाने बंद राहणार असल्याचे दादर व्यापारी संघटनेचे सुनील शाह यांनी सांगितले.
दादर परिसर हे गजबलेले ठिकाण आहे. येथे दररोज लाखो लोक खरेदीसाठी येत असतात. ही गर्दी टाळण्यासाठी पालिकेतर्फे आम्हाला एकदिवसाआड बंद करण्यास सांगितले होते. मात्र, आम्ही आमची दुकाने गुढीपाडव्यापर्यंत बंद ठेवणार आहोत. कारण हा व्हायरस नकळत पसरत आहे, असे उपनगरीय सराफी संघटनेचे दीपक देवरूपकर यांनी सांगितले.