मुंबई - राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ( Sthanik Swarajya Sanstha Election ) कार्यक्रम १५ दिवसांत जाहीर करण्याच्या सूचना आहेत. मात्र, निवडणुका केव्हाही लागल्या तरी शिवसेना तयार आहे, असा ठाम विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. सह्याद्री अतिथीगृहात आज ( 10 मे ) सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमाचे अनावरण झाले. त्यानंतर आदित्य ठाकरे ( Minister Aaditya Thackeray ) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, शाळांबाबत आम्ही नवे उपक्रम हातात घेतोय. महाराष्ट्र कोरोना काळात इतर राज्याच्याही संपर्कात होता. कोरोनाकाळात शिवसेनेने चांगले काम केलं आहे. त्यामुळे आगामी काळात केव्हाही निवडणुका झाल्या तरी आम्ही तयार आहोत. तसेच, शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाबाबत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेबाबत भाष्य करताना, शिवसेनेला इतरांसारखी गर्दी दाखवण्याची गरज नाही, असा टोला मनसेला लगावला. तर मुख्यमंत्र्यांची सभा विराटच होईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने कोरोना काळात जे काम केल आहे, ते सर्वांना माहित असल्याचेही ठाकरेंनी सांगितले आहे.
'आपण आता का भांडतोय?' - राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींबाबत विचारले असता आदित्य ठाकरेंनी म्हटले की, त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. आजच्या घडीला आम्ही सगळे राजकीय पक्ष इतिहासात काय घडलं? 20, 25 वर्षांपूर्वी काय झालं यावर भांडतोय. सगळी मिडियाची स्पेस आम्हीच व्यापून टाकलीय. भविष्यात काय करायचंय यावर बोलतच नाहीये, अशी खंतही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - Mahavikas Aghadi : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी शक्य?