मुंबई - मुंबई महापालिकेतील नगरसेवकांकडून करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट कामांची दखल घेऊन त्यांच्या कामाचे प्रगतीपुस्तक ''प्रजा फाऊंडेशन'' या एनजीओकडून प्रसिद्ध केले जाते. या प्रगती पुस्तकानुसार मुंबईतील २२७ नगरसेवकांपैकी १० टक्के म्हणजेच २२ 'अ' आणि 'ब' श्रेणीत झाला आहे. तर उर्वरित सर्व नगरसेवकांचा समावेश क, ड, ई, फ श्रेणीत समावेश झाला आहे. गेल्या चार वर्षाच्या कामगिरीची पक्षनिहाय तुलना केली असता सर्वाधिक चांगली कामगिरी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची असून त्यांचे आर्थिक वर्ष २०१७ ते २१ या काळातील गुण ५७.२१ टक्के आहेत, त्याखालोखाल शिवसेनेला ५५.८८ टक्के आणि समाजवादी पार्टीची ५५.०५ टक्के नगरसेवकांची कामगिरी आहे, अशी माहिती प्रजा फाऊंडेशनचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले आहे.
नगरसेवकांमध्ये विरोधी पक्ष नेते रवी राजा अव्वल -
प्रजा फाउंडेशन ही एनजीओ दरवर्षी नगरसेवक आणि आमदार यांनी केलेल्या कामाचा वार्षिक अहवाल प्रगती पुस्तकरूपाने प्रसिद्ध करते. माहितीच्या अधिकारातून देण्यात आलेल्या माहितीवर आधारित हे प्रगतीपुस्तक असते. आज २०१७ - १८ ते २०२०- २१ या चार वर्षाचे एकत्र प्रगतीपुस्तक ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले. यावेळी मेहता बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, महापालिकेतील पहिल्या दहा नगरसेवकांमध्ये काँग्रेसच्या ३, शिवसनेच्या ३ तर भाजपाच्या ४ नगरसेवकांचा समावेश आहे. प्रजा फाऊंडेशनच्या मानकानुसार पहिल्या क्रमांकावरील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांना ८१.१२ टक्के, दुसऱ्या क्रमांकावरील समाधान सरवणकर यांना ८०.४२ टक्के, तिसऱ्या क्रमांकावरील हरीष छेडा यांना ७७.८१ टक्के गुण प्राप्त झाले आहे. मुंबई पालिकेतील एकूण २२७ नगरसेवकांपैकी केवळ १० टक्के म्हणजेच २२ नगरसेवकांचा 'अ' आणि 'ब' श्रेणीत समावेश आहे. तर उर्वरित नगरसेवकांना क, ड, ई, फ श्रेणीत समावेश झाला आहे.
१२७ नगरसेवक 'सी' व 'डी' श्रेणीत -
संयुक्त माहितीचे विश्लेषण केले असता या वेळी प्रगती पुस्तकाचे सरासरी गुण ५५.१० टक्के आहेत. तर मागील टर्ममध्ये एप्रिल २०१२ ते मार्च २०१६ मध्ये सरासरी गुण ५८.९२ टक्के होते. एप्रिल २०१७ ते मार्च २०२१ यादरम्यान, एकूण २२० नगरसेवकांपैकी ७ नगरसेवक 'इ' आणि 'फ' या श्रेणीमध्ये होते आणि केवळ २ जणांना 'अ' श्रेणी व २० जणांना 'ब' श्रेणी मिळाली आहे. बहुसंख्य स्हणजे १२७, नगरसेवकांना 'सी' व 'डी' श्रेणी मिळालेल्या आहेत. समित्यांचे कामकाज कार्यक्षमपणे करून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ए, बी, सी, डी श्रेणीतील नगरसेवकांची संख्या वाढली पाहिजे आणि इ एफ श्रेणीमध्ये कोणीच नगरसेवक येता कामा नये.", असे संचालक मिलिंद म्हस्के यांनी म्हटले आहे.
नगरसेवक उदासीन -
टर्मच्या प्रत्येक वर्षागणिक नगरसेवकांची उपस्थिती कमी होताना दिसते आहे. मागील टर्मच्या वर्ष २०१२-१३ मध्ये नगरसेवकांच्या एकंदर उपस्थितीची टक्केवारी ८१ टक्के होती, जी २०१४ - १५ मध्ये ६९ टक्कांवर आली. तसेच, चालू टर्ममध्ये २०१७ - १८ मध्ये एकंदर उपस्थिती ८२ टक्के होती जी २०१९ - २० मध्ये ७४ टक्क्यांवर आली. २०१७ -१८ ते २०२० -२१ या कालावधीमध्ये ५० टक्के म्हणजेच 115 नगरसेवकांनी वर्षभराच्या काळात केवळ १७ प्रश्न विचारले आहेत. नागरिकांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत नेणे व त्यांची सोडवणूक करणे ही नगरसेवकांची एक मुख्य जबाबदारी आहे. मात्र, २०१७ - १८ ते २०२० - २१ या कालावधीमध्ये ९९.५५ टक्के नगरसेवकांनी नागरिकांच्या तक्रारींचे प्रश्न विचारताना प्राधान्य दिल्याचे दिसत नाही. ज्यामुळे त्यांची श्रेणी इ व फ वर घसरलेली आहे.
३० नगरसेवकांनी एकही प्रश्न विचारलेला नाही -
मागील चार वर्षात नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन केले असता कोणत्याही नगरसेवकाला अ श्रेणी प्राप्त करता आलेली नाही. इ वॉर्डमधील एमआयएमच्या गुलनाझ मो. सलिम कुरेशी यांनी २०१७ - १८ ते २०२० - २१ या कालावधीमध्ये एकही प्रश्न विचारलेला नाही. तसेच, एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या महामारीच्या काळात ज्या विविध बैठका झाल्या त्यात ३० नगरसेवकांनी एकही प्रश्न विचारलेला नाही. "हा बदल घडण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विचारविनिमयाच्या अधिक बैठका घेणे, संबंधित हितधारकांमधील परस्पर समन्वय वाढवणे आणि सत्तेचे विकेंद्रिकरण करणे जरुरीचे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे चालू टर्मच्या नगरसेवकांच्या कामगिरीचा विचार करण्याची ही अगदी योग्य वेळ आहे" असे निताई मेहतानी सांगितले.
टॉप टेन नगरसेवक/ नगरसेविका -
- रवी राजा - काँग्रेस
- समाधान सरवणकर - शिवसेना
- हरीश छेडा - भाजपा
- सुजाता पाटेकर - शिवसेना
- विरेंद्र चौधरी - काँग्रेस
- सचिन पडवळ - शिवसेना
- स्वप्ना म्हात्रे - भाजपा
- मेहर हैदर - काँग्रेस
- सेजल देसाई - भाजपा
- प्रीती साटम - भाजपा
हेही वाचा - नारायण राणेंनी अभिवादन केल्यानंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण