मुंबई - देशातील शेतकरी आंदोलन चिघळू लागले आहे. पंजाब-दिल्ली आणि हरयाणा-दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून शेतकरी केंद्राच्या नवीन कृषी कायद्याचा विरोध करत आहे. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून लाठ्याकाठ्या, थंड पाण्याचे फवारे, अश्रुधुराची नळकांडी फोडून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावरूनच आजच्या सामनातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. यासोबत सीबीआय, ईडीला हाताशी घेऊन केंद्र सरकार करत असलेल्या कारवायांवरही निशाणा साधला आहे.
शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणणे दळभद्रीपणाचे लक्षण -
भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांना खलिस्तानवादी, देशद्रोही म्हणणे, ही भूमिका देशातील वातावरण चिघळवणारी आहे. पंजाबात खलिस्तानचा विषय काढून पुन्हा राजकारण सुरू करणे देशाला भारी पडेल. एखादा विषय हातातून निसटल्यावर हिंदुस्थान-पाकिस्तान करण्याची भाजपाला सवय लागली आहे, असा टोला शिवसेनेने सामनातून लगावला आहे. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर नेटाने थांबला असून तो त्यांच्या मागण्यासाठी लढतो आहे. तो पंजाबचा आहे, म्हणून त्याला देशद्रोही, खलिस्तानवादी म्हणणे दळभद्रीपणाचे लक्षण आहे, असे सामनातून सुनावले.
सरदार पटेलांचा पुतळा अश्रू ढाळत असेल -
ज्याप्रकारे शेतकऱ्यांना मारहाण केली जात आहे, ते पाहून सरदार पटेल यांचा भव्य पुतळा अहमदाबादेत खरच अश्रू ढाळत असेल, अशी टीकाही करण्यात आली आहे. इथे शेतकऱ्यांना मारहाण केली जात आहे. तिकडे मात्र, चीनचे सैन्य आमच्या हद्दीत घुसून ठाण मांडून बसले आहे. ज्याप्रकारचा बलप्रयोग शेतकऱ्यांसाठी केला जातोय, तसा बलप्रयोग लडाख किंवा जम्मू-काश्मीरात होऊ नये, याचे आश्चर्य वाटते. चीनला उत्तर देण्यासाठी मरीन कमांडो तैनात केले आहेत. गरुड सैन्य, पॅरास्पेशल फोर्सला या कमांडोमुळे मजबुती मिळेल, असे आपण वर्षभरापासून ऐकत आहोत. मात्र, बलप्रयोग करून हटवल्याच्या शौर्याची बातमी अद्याप ऐकायला मिळाली नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.
महिनाभरात राज्यातील ११ जवान हुतात्मा -
गेल्या महिन्याभरात राज्यातील ११ जवान दहशतवादी कारवायात हुतात्मा झाले. बलिदान देणे, त्याग करणे ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र, राज्यकर्ते असे किती बळी आणखी देणार आहेत, असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
ईडी, सीबीआयला चीन, पाकविरोधात जुंपावे -
राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय या यंत्रणांचा वापर केला जात आहे. या यंत्रणांना सरकारने चीन-पाकिस्तानविरोधात जुंपावे. हत्यार म्हणून वापरल्या जाणाऱ्या या तपास यंत्रणांना चीन, पाकिस्तानची सुपारी देण्यास काहीच हरकत नाही. कदाचित त्यांच्यामुळे चीन, पाकिस्तान गुडघे टेकून शरण येतील आणि पाकडे पीओके सोडून पसार होतील, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.
हेही वाचा -दिल्ली मार्च : उत्तरप्रदेश-दिल्ली सीमेवर आंदोलक आणि पोलिसांत बाचाबाची
हेही वाचा -'शेतकरी आंदोलन राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं म्हणालो नाही'