मुंबई - राज्यात सुमारे महिनाभर सुरू असलेला मुख्यमंत्रिपदावरील सत्तापेच आज सुटणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर होणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. तर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधींनाही उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.
हेही वाचा -उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला ७०० शेतकऱ्यांना निमंत्रण
कधीही सत्तेच्या खुर्चीत बसणार नाही, अशी भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती. त्यामुळे ठाकरे घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने आजवर लाभाचे पद भूषविलेले नाही. उद्धव यांनी आजवर कधीही निवडणूक लढविली नाही. मात्र ते थेट मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत जाऊन बसणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनेच्या भवितव्याबाबत शंकाकुशंका व्यक्त केल्या जात होत्या. पण, उद्धव यांनी पक्षाची धुरा समर्थपणे पेलली. आज ते शिवसेनेला सत्तेच्या तख्तापर्यंत घेऊन गेले आहेत.
हेही वाचा-उद्धव ठाकरेंचा फोनवरून पंतप्रधानांशी संवाद; शपथविधी सोहळ्याचे दिले निमंत्रण
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नव्हते इच्छुक-
मागील शुक्रवारी जेव्हा शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाचे नेते नेहरू सेंटर येथे पहिल्यांदा भेटले. तेव्हा मुख्यमंत्री कोण असेल यावर चर्चा झाली. उद्धव ठाकरे महाविकासआघाडी सरकारचे नेतृत्त्व करत नाहीत, तोपर्यंत नव्याने स्थापन होणार सरकार स्थिर राहणार नाही, असे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचे मत होते. शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्याबाबत संभ्रमात होते. अखेरीस शरद पवारांनीही आग्रह केल्यानंतर ते मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसण्यास राजी झाले.
हेही वाचा-शिवसेनाभवनजवळ झळकला बाळासाहेब ठाकरे व इंदिरा गांधींचे छायाचित्र असलेला फलक!
शिवाजी पार्कवर जय्यत तयारी-
शिवसेनेने पहिल्या दिवसापासूनच आपला मुख्यमंत्री झाला तर शपथविधी हा शिवाजी पार्क येथे शपथविधी होईल, असे सांगितले होते. त्यानुसार शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत सरकार स्थापन होणार आहे. शपथविधीसाठी महाराष्ट्रातील तसेच देशातील अनेक मोठे मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. यामुळे याठिकाणी पालिका व महाराष्ट्र राज्य पोलीस प्रशासनाकडून मोठी व्यवस्था करण्यात येत आहे. शपथविधीसाठी देशभरातील शिवसैनिक आणि राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते देखील शिवाजीपार्क येथे उपस्थित राहणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था, पाणी, शौचालय पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्वांना हा शपथविधी कार्यक्रम पाहता यावा यासाठी मोठ्या एलईडी लाइट्स मोठे मंडप तसेच सुरक्षा व्यवस्था सज्ज करण्यात आल्याचे पालिका व पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा- आदित्य ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट, शपथविधी सोहळ्याचे दिले निमंत्रण
शिवाजी पार्क येथून शिवसेनेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे अनेक वर्षांपासून शिवसैनिकांना संबोधित होते. त्याच ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याने राज्यभरातील शिवसैनिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला आहे. शपथविधी सोहळ्याला राज्यातील 700 शेतकऱ्यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. यामुळे हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे.
हेही वाचा-उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी शिवाजी पार्कवर जय्यत तयारी