मुंबई - 'स्वातंत्र्याची नवी व्यवस्था, नवी व्याख्या, नवा इतिहास सध्या रचला जात आहे. 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक आहे. खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाल्याचा साक्षात्कार काही गांजाडय़ांना झाला आहे.' असा सणसणीत टोला शिवसेनेने अभिनेत्री कंगना रणौतचे नाव न घेता लगावला आहे.
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त 'शिवतीर्थावरील महायोद्धा' या शिर्षकाखाली लिहिलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने देशाच्या सध्याच्या परिस्थितीत 'आज बाळासाहेब हवेच होते! असे जनतेला प्रकर्षाने वाटत असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच 1947 ला स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली आणि खरे स्वातंत्र्य 2014ला मिळाल्याचे म्हणणाऱ्या कंगना रणौत चे नाव न घेता शिवसेनेने तिच्या सह तिचे समर्थन करणाऱ्यांचा यथेच्छ सामाचार घेतला आहे.
'स्वातंत्र्य 2014 साली मिळाल्याचा साक्षात्कार काही गांजाडय़ांना झाला'
'स्वातंत्र्याची नवी व्यवस्था, नवी व्याख्या, नवा इतिहास सध्या रचला जात आहे. 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक आहे. खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाल्याचा साक्षात्कार काही गांजाडय़ांना झाला आहे.' अशा तिखट शब्दात शिवसेनेने कोणाचेही नाव न घेता स्वातंत्र्याची नवी व्याख्या करणारे आणि संदर्भ बदलू पाहाणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
त्याचबरोबर कंगनाच्या सूरात सूर मिसळणाऱ्यां महाराष्ट्रातील लोकांना शिवसेनेने भिकारडे म्हणत आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी काय केले असते हेही सांगितले आहे. 'त्याच गांजाडय़ांनी फेकलेल्या चिलमीच्या थोटकांचा झुरका मारून महाराष्ट्रातील काही भिकारडे लोक, 'होय होय, 1947 पर्यंतचा स्वातंत्र्यलढा, क्रांतिकारी हा बकवास आणि भिकाऱ्यांचे आंदोलन होते, असे त्याच 'तारे'त बरळू लागले आहेत. लोकमान्य टिळकांपासून ते वीर सावरकरांपर्यंत, सरदार पटेलांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत, भगतसिंगांपासून चापेकर बंधूंपर्यंत सगळय़ांना एकजात स्वातंत्र्यलढय़ातील भिकारी असे संबोधणाऱ्यांची गांजाची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते.' असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
'आज महाराष्ट्रातील विरोधी पक्ष त्या गांजाच्या शेतीचे समर्थन करून स्वातंत्र्य, क्रांतिकारकांचा अवमान करीत आहेत. म्हणूनच लोक म्हणतात, आज बाळासाहेब हवे होते.' असे म्हणत विरोधकांनाही टोला लगावला आहे.