मुंबई : शिवसेना आणि शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा, असे समीकरण आहे. यंदा मात्र या मेळाव्यावर कोरोनाचे सावट होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा रद्द होणार का? अशा चर्चा सुरू असतानाच, शिवसेना नेते संजय राऊत यांनी दसरा मेळावा होणार असल्याचे सांगितले आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी लाखो शिवसैनिकच नव्हे, सर्वसामान्य मुंबईकर दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर जमत असत. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे. यंदा कोरोनामुळे या परंपरेला खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता राऊत यांनी दिलेल्या माहितीनंतर, दसरा मेळावा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
असा पार पडणार मेळावा..
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा दसरा मेळावा विशेष असणार आहे. या सोहळ्याला केवळ १०० जण उपस्थित राहतील. तसेच, दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कमध्ये हा सोहळा पार न पडता, सावरकर स्मारक सभागृहामध्ये मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच, यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे.
सोशल मीडियावरुनही होणार प्रसारण..
यावर्षीच्या दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार नाही. मात्र, तरीही सर्व लोकांना या सोहळ्याला उपस्थित राहता येणार आहे. सावरकर स्मारकात होणाऱ्या या सोहळ्याचे सोशल मीडियावरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ज्यामुळे घरबसल्या लोक या सोहळ्याला उपस्थित राहू शकतील.