मुंबई - शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी होणार की नाही यावर चर्चा सुरू होती. मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी या चर्चेवर परदा टाकला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर होत असतो. मात्र कोरोना संकटामुळे यंदा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत यांनी आज (सोमवारी) प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. या वेळी देखील दसरा मेळावा होणार आहे. फक्त स्थान बदलले असले तरी मेळावा जोरदार होणार असून शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील आणि देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतील, असे राऊत यांनी सांगितले.
याअगोदर शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते, की दसरा मेळावा होणार मात्र कुठे आणि केव्हा हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. आज त्यांनी दसरा मेळावा कुठे होणार याबाबत माहिती दिली आहे. यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार नाही. नियम आणि संकेतांचे पालन करुन दसरा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरु आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन मेळावा घेण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेने पहिलाच दसरा साजरा केला होता. शिवसैनिकांसाठी हा मेळावा ऑनलाइन देखील दाखविण्यात आला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जहरी टीका केली होती. हा दसरा मेळावा शिवसेनेसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण पुढच्या वर्षी मुंबई महानगरपालिकेचे निवडणुका आहे. यामुळे हा दसरा मेळावा चर्चेत आहे. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महानगरपालिका, उत्तर प्रदेश येथे घडलेली घटना, यावर मुख्यमंत्री बोलण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा - 'महाराष्ट्र बंद'वर काय म्हणाले संजय राऊत?