मुंबई - मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना कोर्टाने 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी दिली आहे. शनिवारी रात्री उशिरा सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली होती. सचिन वाझे यांच्या सर्व प्रकरणावर आज भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सचिन वाझे आणि वरूण सरदेसाई यांच्यामधील आर्थिक गैरव्यवहार संदर्भात खळबळजनक आरोप केले आहेत.
हेही वाचा - जाणून घ्या, कोण आहेत वरूण सरदेसाई?
सचिन वाझे हे आयपीएलमध्ये बेटिंग लावणाऱ्या बुकींना फोन करून, दीडशे कोटी आम्हाला द्या तर आम्ही तुमच्यावरती कोणतीच कारवाई करणार नाही, अशी धमकी सचिन वाझे हे बुकींना देत होते. त्याच दरम्यान शिवसेनेच्या अत्यंत जवळ असलेले वरूण सरदेसाई हे सचिन वाझे यांना फोन करून तुम्ही बेटिंग करणाऱ्या लोकांकडून पैशांची मागणी केलेली आहे. त्यासंदर्भात आम्हाला माहिती मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून जे पैसे घेतात त्यातला आमचा हिस्सा देखील आम्हाला द्या, असे आर्थिक गैरव्यवहार सचिन वाझे आणि वरूण सरदेसाई यांच्यामध्ये होत असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.
सचिन वाझे आणि वरूण सरदेसाई यांच्यामध्ये खूप वेळा फोनवरून संभाषण झाले आहे. या दोघांमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात चर्चा केलेली आहे. त्यामुळे आमची एनआयएकडे मागणी आहे की त्यांनी या दोघांचे सीडीआर रेकॉर्ड काढावे आणि या दोघांची चौकशी करावी, खासकरून वरूण सरदेसाई यांची एनआयएकडून चौकशी करावी, कारण वरूण सरदेसाई यांना शिवसेनेकडून वेगळी विशेष वागणूक दिली जात आहे. सरकारमध्ये नसताना देखील त्यांचा सरकारी कामांमध्ये हस्तक्षेप आहे. वेगवेगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना ते भेटतात. त्यामुळे वरूण सरदेसाई यांची भूमिकाही अत्यंत संदिग्ध असून, त्यांची चौकशी झालीच पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्या संदर्भात मी स्वतः एनआयएला पत्रसुद्धा देणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.
हेही वाचा - आधी मुख्यमंत्र्यांची चर्चा, आता राष्ट्रवादीची बैठक, वाझे प्रकरणावर पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
कोण आहेत वरुण सरदेसाई?
वरुण सतीश सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेची महत्त्वाची जबाबदारी आहे. तसंच वरुण यांच्याकडे शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. सरदेसाईंनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी जाहीररित्या सर्वप्रथम मागणी वरुण यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता. मुंबई सिनेट निवडणुकीच्या युवासेनेच्या व्यूहरचनेत वरुण सरदेसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.