मुंबई - सामनाच्या अग्रलेखात आज सरसंघचालकांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले आहे. त्याचवेळी यानिमित्ताने भाजप करत असल्याच्या राजकारणाचा समाचारही अग्रलेखात घेतला आहे. अग्रलेखामध्ये असे म्हटले आहे की, मुस्लिम समाजानेही भारत ही मातृभूमी म्हणून स्वीकारली आहे, येथील सर्वसमावेशक भारतीय संस्कृती स्वीकारली आहे, असे सरसंघचालकांनी अधोरेखित केले. हा विचार सध्याच्या वातावरणात मोलाचा आहे. श्री. भागवत यांनी कान टोचले हे खरेच, पण कान टोचून काही उपयोग होईल का? मशिदींखालचे शिवलिंग हा जसा काही जणांसाठी चिंतेचा विषय आहे, तसा मग पोर्तुगीज आक्रमकांनी गोव्यासारख्या राज्यात मंदिरे पाडून तेथे त्यांचे चर्च उभारल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्या चर्चखालीही शिवलिंग शोधायचे काय? म्हणूनच सरसंघचालकांनी जे सांगितले त्यावर अंमल व्हावा अन्यथा तणाव आणि स्फोटांचे भय कायम राहील. मशिदींखाली शिवलिंगाचा शोध घेणारे सरसंघचालकांनी आता जे सांगितले त्यापासून तरी बोध घेणार आहेत का?, असे प्रश्नही अग्रलेखात उपस्थित केले आहेत.
भागवत यांनी देशाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका - अग्रलेखात पुढे असे म्हटले आहे की, सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका व्यक्त केली आहे, ‘‘प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका, ‘आमचेच खरे’ असा कट्टरवाद नको.’’ भागवत यांची भूमिका हिंदुत्ववादी असली तरी संयमाची आहे. भागवत म्हणतात, ज्ञानवापीशी हिंदूंच्या भावना जुळलेल्या आहेत. त्यावर न्यायपालिका देईल तो निर्णय प्रत्येकाने मान्य करायला हवा. एकापरीने सरसंघचालकांनी देशातील सध्याच्या वातावरणावर परखड मत व्यक्त केले आहे, पण शिवलिंगाचा सर्वत्र शोध घेणारे सरसंघचालकांचे मत मान्य करतील काय? ही भारतभूमी सर्वांना सामावून घेणारी आहे. कुणालाही न बदलविणारी, प्रत्येकाच्या पूजा पद्धतीचा सन्मान राखणारी आहे. या परंपरेला अनुरूप असेच हिंदूंनी स्वतःचे आचरण ठेवावे असेही सरसंघचालक म्हणतात. या देशातील हिंदूंचे आचरण परंपरेला साजेसेच आहे, पण हिंदूंची व मुसलमानांची डोकी भडकविण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. अयोध्येत रामजन्मभूमीवर मंदिर उभारणीच्या वेळी ‘‘यापुढे इतर मंदिर-मशिदींच्या वादात संघ पडणार नाही’’ अशी भूमिका सरसंघचालकांनी मांडली. ती संयमी भूमिका हिंदुत्ववाद्यांच्या पचनी पडली नाही. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आहे व ती जागा हिंदूंच्या ताब्यात यावी असे या मंडळींना वाटते. त्यामुळे देशातील वातावरण पुन्हा गढूळ होऊ शकते.
मुस्लिमांचाही विचार करण्याचा सल्ला - अग्रलेखात इतरही काही प्रश्न उपस्थित करुन देशासाठी लढलेल्या मुस्लिमांचाही विचार करण्याचा सल्ला यामध्ये देण्यात आला. शिवलिंग शोधण्याच्या मोहिमा राबविणाऱ्यांच्या खिजगणतीत हा आक्रोश व रक्तपात आहे काय? कश्मीर खोऱ्यांत हिंदूच नव्हे, तर मुसलमानदेखील मारला जातोय. मुसलमान पोलीस अधिकाऱ्यांना ‘टार्गेट’ केले जात आहे. मंदिर-मशिदीवर तणाव निर्माण करून कश्मीरचा रक्तपात कमी होणार नाही. कश्मीरचा सध्याचा प्रश्न फक्त हिंदूंपुरताच मर्यादित नाही. तेथे देशासाठी मुसलमानांचेही बलिदान सुरूच आहे. देशाच्या प्रत्येक स्वातंत्र्य लढय़ात हिंदूंसोबत राष्ट्रीय वृत्तीचे मुस्लिम लढले आहेत. अश्फाकउल्ला खान, इब्राहिमखान गारदी हे येथील मुस्लिमांसाठी आदर्श आहेत. त्यांचा संबंध भारताशी आहे, बाहेरील राष्ट्रांशी नाही. मुस्लिम समाजानेही भारत ही मातृभूमी म्हणून स्वीकारली आहे, येथील सर्वसमावेशक भारतीय संस्कृती स्वीकारली आहे, असे सरसंघचालकांनी अधोरेखित केले. हा विचार सध्याच्या वातावरणात मोलाचा आहे. श्री. भागवत यांनी कान टोचले हे खरेच, पण कान टोचून काही उपयोग होईल का? की ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ असेच पुन्हा घडणार आहे. मशिदींखालचे शिवलिंग हा जसा काही जणांसाठी चिंतेचा विषय आहे, तसा मग पोर्तुगीज आक्रमकांनी गोव्यासारख्या राज्यात मंदिरे पाडून तेथे त्यांचे चर्च उभारल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्या चर्चखालीही शिवलिंग शोधायचे काय? म्हणूनच सरसंघचालकांनी जे सांगितले त्यावर अंमल व्हावा अन्यथा तणाव आणि स्फोटांचे भय कायम राहील. मशिदींखाली शिवलिंगाचा शोध घेणारे सरसंघचालकांनी आता जे सांगितले त्यापासून तरी बोध घेणार आहेत का?