मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत दिलेले अल्टिमेटम आज संपल्यानंतर आज ( बुधवारी ) पहिल्याच दिवशी मुंबईसह राज्यभरात समिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. या विषयावर शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांनी पत्रकार परिषदेत राज ठाकरेवर ( MNS chief Raj Thackeray ) सडकून टीका करत, राज्यात भोंगा ( Loudspeaker issue ) हा विषयच नाही, असे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Union Home Minister Amit Shah ) यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा, असेही म्हटले आहे.
'भोंग्याबाबत कुठेही उल्लंघन नाही' : भोंग्यावरून राज्यात, मुंबईत आंदोलनाचा प्रश्नच येत नाही. राज्याचे पोलीस महासंचालक, गृहमंत्री प्रत्येकाच्या भूमिका पाहिल्या असतील तर स्पष्ट दिसेल. महाराष्ट्रामध्ये भोंग्याच्या बाबतीत कुठेही कायद्याचे उल्लंघन झालेले नाही. सुप्रीम कोर्टाने भोंग्याबाबत निर्णय घालून दिलेले आहेत, त्या पद्धतीने काम सुरू आहे. त्यावर बेकायदेशीर कोण काही करत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. याबाबत गृहमंत्री योग्य ते उत्तर देतील. तसेच मुंबई किंवा महाराष्ट्रात भोंग्याच्या बाबतीत आंदोलन करावे, अशी काही परिस्थिती बिघडलेले नाही आहे, असे सांगत संजय राऊत यांनी मनसेकडून भोंग्यावरून केल्या जाणाऱ्या आंदोलनावर राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
'गृहमंत्री अमित शहा यांनी यात लक्ष घालावे' : महाराष्ट्रात किंवा देशात अशा प्रकारे कोणी चिथावणीची भाषा करत असेल तर ती फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आहे. त्याने कायद्याचे उल्लंघन होत आहे, असेही संजय राऊत म्हणाले. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे, तरच देश शांत होईल, असेही राऊत म्हणाले. मला कुठे आंदोलन दिसत नाही. कुठे बेकायदेशीर भोंगे नाही आहेत. तर तुम्ही तुमचे भोंगे बेकायदेशीरपणे लावत असाल तर तुम्हीच कायद्याचे उल्लंघन करत आहात, असे सांगत संजय राऊत यांनी मनसेच्या आंदोलनावरून त्यांच्यावरच पलटवार केला आहे. आंदोलन कशी करावी हे शिवसेनेकडून शिकले पाहिजे. आम्ही ५०/५५ वर्षे आंदोलन करत आहोत. काही लोकांचे छंद असतात. काही राजकारणात हवशे, नवशे, गवशे असतात. त्यांना वाटते काहीतरी करावे, असा टोमणाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
'बाळासाहेबांचे विचार आम्हाला समजावू नयेत?' : महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचे सरकार असले तरी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत, व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना रस्त्यावरील नमाज बाबत काय निर्णय घ्यायचा व मशिदीवरील भोंग्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे दुसर्यांकडून शिकण्याची गरज नाही, असे सांगत बाळासाहेबांचे जुने काही प्राचीन ट्विट जरी टाकले तरी ते आम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यांनी पुन्हा पुन्हा बाळासाहेब तपासायला पाहिजेत, असेही राऊत म्हणाले. तसेच बाळासाहेबांचे विचार आम्हाला समजावू नयेत, इतपत आम्ही काय खाली घसरलेलो नाही आहोत. बाळासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट्स आम्ही त्यांना पाठवू, असेही राऊत म्हणाले.
'डोकं ठिकाणावर ठेवून वक्तव्य करा?' : मशिदीवरील नाहीतर मंदिरावरील सुद्धा स्पीकर बंद करा, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की हे अत्यंत बकवास विधान आहे. मंदिरावर भोंगे लागतात, गावागावांमध्ये स्पीकर लागतात, ते बंद करायचे का? वर्षानुवर्षे कार्यक्रम सुरू असतात ते सर्व कार्यक्रम तुम्हाला बंद करायचे आहेत का? डोकं ठिकाणावर ठेऊन वक्तव्य केले तर महाराष्ट्रावर उपकार होतील, असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
'महाराष्ट्र विरोधात ज्यांनी कटकारस्थान केले ते तुरुंगात गेले' : उद्धव ठाकरेंना दुसऱ्याकडून सल्ला घेण्याची गरज नाही. सरकार आहे ते नियमानुसार वागत आहे. उद्या कोणीतरी अल्टीमेटम देतोय म्हणून राज्य चालणार नाही. राज ठाकरे यांच्यावर लावलेले कलम हे सौम्य आहेत की नाही याविषयी मी बोलणार नाही, असे सांगत हा गृहमंत्रालयाच्या विषय आहे. पण मला असं वाटतं महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे कायद्याने काम करणारे सक्षम सरकार आहे. या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतात, मार्गदर्शक शरद पवार आहेत त्यामुळे कोणी काळजी करू नये. महाराष्ट्र विरोधात ज्यांनी कारस्थान केले त्यांना तुरुंगात जायची वेळ आलेली आहे, असेही राऊत म्हणाले.
'बेगडी धर्मनिरपेक्षता तर बेगडी हिंदुत्व' - ज्यांनी बाळासाहेबांना सोडलं, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. शिवसेनेच्या पाठीत भारतीय जनता पक्षाने खंबीर खुपसला त्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकू नये. हिंदुत्व शिवसेनेचा पंचप्राण आहे, तर बाळासाहेब आत्मा आहे व राहील असे सांगत त्यांनी त्यांचे राजकारण कराव, कोणाचा बोट पकडून, कोणाचा पदर पकडून तर कोणाच्या खिशात हात घालून राजकारण करत असेल तर करावं. लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे. शरद पवार यांची बेगडी धर्मनिरपेक्षता यावर बोलताना ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुमचं वेगळेपण सिद्ध होतंय. बेगडी धर्मनिरपेक्ष आहेत तसे बेगडी हिंदुत्ववादी सुद्धा आहेत. असे सांगत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टोला लगावला आहे.
हेही वाचा - Raj Thackeray Video : 'त्या' 135 मशिदीवर कारवाई का केली नाही? राज ठाकरेंचा पोलिसांना सवाल