मुंबई शिवसेना नेते संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम आणखी वाढला आहे. राऊत यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र याच प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामीनावर सुनावणी सुरू असल्याने प्रवीण राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 27 सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर स्वातंत्र्य सुनावणी घेण्यात यावी, असे संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांच्या वकिलाने सांगितले आहे. आज सुनावणी होऊ शकली नाही. सुनावणी करता प्रत्यक्ष हजर राहण्याकरिता संजय राऊत अर्थार रोड कारागृहातून ( Arthur Road Jail ) निघाले. मात्र ट्राफिकमुळे संजय राऊत यांना न्यायालयात पोहोचायला उशीर झाला होता.
पीएमएलए कोर्टात सुनावणी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार होती. परंतु वाहतूक कोंडीमुळे राऊत यांना कोर्टात पोहचायला उशिर झाला. संजय राऊतांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जवळजवळ दीड तास उशिराने हजर करण्यात आले आहे. पण यापूर्वीच संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून निश्चित करण्यात आलं होतं.
संजय राऊत यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आणि कोठडीबाबत सोमवारी 19 सप्टेंबरला एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाकडून संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढवली. आता संजय राऊतांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. 1,039.79 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात संजय राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा या आरोपपत्रातून ईडीने केला आहे.
ईडीची प्रकरण काय ईडीने केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलच्या बेकायदेशीर कारवाईमधून 1,039.79 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून 100 कोटी रुपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले आहे. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत. ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असे ईडीने सांगितले आहे. 2010 साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 83 लाख रुपये जमा केले होते.
ईडीचा दावा वर्षा यांनी ही रक्कम दादरमध्ये घर विकत घेण्यासाठी केला, असा दावा ईडीने केला आहे. ईडीने चौकशी सुरू झाल्यानंतर वर्षा राऊत यांनी माधुरी यांना 55 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. याच काळात अलिबागमध्ये किहीम बिचजवळ वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावाने 8 प्लॉट विकत घेण्यात आले होते. यातल्या स्वप्ना पाटकर या सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत.
सुजित पाटकर हे संजय राऊतांच्या जवळचे आहेत. जमिनीच्या या व्यवहारामध्ये नोंदणीकृत किंमतीशिवाय जमिन विकणाऱ्याला रोख रक्कमही देण्यात आली. ही संपत्ती आणि प्रविण राऊत यांच्या इतर संपत्तीची माहिती घेतल्यानंतर प्रविण राऊत आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची संपत्ती जप्त करण्यात आली, अशी माहिती ईडीने दिली. दोन समन्सनंतर संजय राऊत चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यानंतर ईडीने रविवारी सकाळीच संजय राऊत यांच्या घरावर धाड टाकली. दिवसभर चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. ईडीने याआधी राऊतांची दादर आणि अलिबागमधली संपत्ती जप्त केली आणि राऊत यांना अटक करण्यात आली होती.