मुंबई- सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा मिळाल्यानंतर गुरुवारी ईडीकडून समन्स आल्यानंतर ते आज चौकशीसाठी हजर झालेले आहेत. टॉप्स ग्रुपच्या संदर्भात मनी लॉन्ड्रिंगला घेऊन ईडीकडून तपास केला जात होता. तत्पूर्वी टॉप सिक्युरिटीचा मालक अमित चांदोले आणि टॉप ग्रुपचा माझी एमडी एम शशीधरण या दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी अमित चांदोले हा आमदार प्रताप सरनाईक यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते.
सर्वोच्च न्यायालयाचे कारवाई न करण्याचे आदेश-
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या संदर्भात ईडी कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये, अशी याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा देत ईडीला कुठल्याही प्रकारची कारवाई आमदार प्रताप सरनाईक किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात करू नये, असे निर्देश दिले आहेत.
चोरीचा माल पकडला जाण्याची भीती
आमदार प्रताप सरनाईक यांना माहित आहे की त्यांचा चोरी पकडली जाणार असून त्यांना जेलमध्ये जावे लागणार आहे. यामुळेच उद्धव ठाकरे व आमदार प्रताप सरनाईक यांना चोरीचा माल पकडला जाण्याची भीती असल्यामुळेच त्यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून एमएमआरडीएला 175 कोटींचा चुना लावण्यात आलेला असून हा सर्व प्रकार ईडी चौकशीत समोर येईल, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जरी कारवाई न करण्याचे निर्देश मिळाले असले तरी आमदार प्रताप सरनाईक यांना चौकशीला गुरुवारी ईडी कार्यालयात हजर व्हावे लागेल असेही भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले होते.