मुंबई - राज्यात मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल्स, बार रेस्टॉरेंटना देवदेवतांची नावे देण्यास आणि त्यांच्या प्रतिमा लावण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. या धर्तीवर संबंधित दुकानांच्या प्रवेशद्वारासमोरील मावळ्यांच्या प्रतिकृतींवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
![replicas of Mavle outside liquor shops](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14218640_thumb.jpg)
हेही वाचा - Naming Ceremony At Rani Bagh : राणीबागेत पेंग्विन, वाघाच्या पिल्लांचे बारसे, 'ऑस्कर' आणि विरा' असे नामकरण
राज्यात मद्य विक्री करणाऱ्या बहुतांश दुकानदारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची प्रतिकृती प्रवेशद्वारासमोर ठेवल्याचे चित्र सातत्याने दिसून येते. काही प्रतिकृती मुजरा करतानाच्या आहेत. महाराष्ट्र राज्य श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून ओळख आहे. ज्या मावळ्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून प्राणाची बाजी लावली, अशा थोर मावळ्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने संबंधित दुकानदारांकडून समोर आणला जात आहे. हा प्रकार निंदनीय आहेच, शिवाय मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल, बार, रेस्टॉरेंट आदींकडून त्यांच्या गौरवशाली इतिहासाचा अवमान होत आहे.
शिवाय महाराजांचे मावळे ही मराठ्यांची अस्मिता आहे. त्यामुळे, ही गंभीर बाब विचारात घेऊन राज्य सरकारने मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल, बार, रेस्टॉरेंटना देव - देवतांची नावे देण्यास आणि त्यांच्या प्रतिमा लावण्यास बंदी घातली आहे. दुकानांच्या पाट्या देखील मराठीत असाव्यात अशी सक्ती केली आहे. याच धर्तीवर मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल, बार, रेस्टॉरेंटच्या प्रवेशद्वारासमोर मावळ्यांच्या प्रतिकृतीचा वापर करण्यावर कायमची बंदी घालावी, यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री याबाबत काय अभिप्राय देतात, हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा - राजकारणात मतभेद असावेत वैर नको, लसीकरणासाठी शिवसेना घेणार पुढाकार - किशोरी पेडणेकर