मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी माघार न घेता भाजपने तिसरा उमेदवार उतरवल्याने निवडणूक होणार, हे निश्चित झाले आहे. मात्र, निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यांना जे करायचे ते करून घेऊ द्या, विजय आमचाच होईल, असा दृढ विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली, यानंतर शिवसेना नेते संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत जोर बैठका - राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत जोर बैठका सुरू होत्या. भाजप आणि शिवसेना निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्याने राज्यसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. सर्वच नेते बैठकीला होते. दरम्यान, संजय राऊत म्हणाले की, आम्ही चर्चा केली, राज्यसभा निवडणुकीसोबतच अन्य देखील काही विषय आहेत. मला असे वाटते की निवडणूक होतेय, आम्ही ती निवडणूक स्वीकारलेली आहे. या निमित्त आम्हाला परत एक संधी मिळेल, आमचे बळ दाखवायची. खरे म्हणजे आम्हाला ते दाखवायची इच्छा नव्हती. वाटले होत सगळे सुरळीत होऊन जाईल. पण आता विरोधी पक्षाला निवडणूक व्हावी, असे वाटत आहे. पण एक लक्षात घ्या, निकाल लागल्यावर त्यांना पश्चाताप होईल, असे राऊत म्हणाले.
विरोधकांनी निवडणूक लादली - निवडणूक लादली महाविकास आघाडीचे चारही उमेदवार अगदी व्यवस्थित जिंकून येतील. कोणीही चिंता करू नये आणि अतिशहाणपणा करू नये. संजय पवार हे देखील अगदी पहिल्या फेरीत निवडून जातील. मी दाव्याने सांगतोय, विरोधी पक्षाने आमच्यावर ही निवडणूक लादली आहे. मात्र त्यांना पश्चाताप होणार. घोडेबाजार अजिबात होणार नाही, ज्यांना करायचाय त्यांनी करावा. आमचा आमच्या लोकांवर संपूर्व विश्वास आहे. मात्र जे काही नियोजन करावे लागते ते वेळ आल्यावर आम्ही करू. महाविकास आघाडीकडचे संपूर्ण बहुमत पाहता, आमचे सर्व उमेदवार सहजपणे जिंकतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच घोडे बाजारात उभा राहायची गरज नाही. केंद्रीय यंत्रणाचा दबाव असतोच, त्यांचा वापर काहीजण करू इच्छितात, काहीजण पैशांचा वापर करू इच्छितात, मात्र जे करायचे ते करून घ्या, विजय तर आमचाच आहे, असेही राऊत म्हणाले.