मुंबई - भारतीय जनता पक्षापासून वेगळी झालेली शिवसेना महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नात शिवसेनेने गुजरातमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. गुजरातमधील दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येथील खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. येथून शिवसेनेने दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे.
डेलकर कुटुंबाने बांधले शिवबंधन
दादरा नगर हवलेची खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे येऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर राजकारणात खळबळ उडाली होती. आज (गुरुवार) डेलेकर यांच्या पत्नी आणि मुलगा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
मोहन डेलकरांच्या मृत्यूने दादरा नगर हवेलीची जागा रिक्त
दादरा नगर हवेलीची जागा खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर रिक्त झाली होती. या लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिवंगत डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर लगेचच कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
अस्तित्वासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढणार
शिवसेनेने जोरदार पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात देखील पाय रोवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आता शिवसेना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृहराज्य गुजरात मध्ये पोट निवडणूक लढवणार आहे. ही निवडणूक फक्त अस्तित्व दाखवण्यासाठी नाहीतर जिंकण्यासाठी लढवली जाणार आहे. दिवंगत मोहन डेलकर यांची त्यांच्या मतदारसंघात असलेली ताकद पाहता, या जागेवर शिवसेनेला यश मिळू शकते असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.
संजय राऊतांनी ट्विटकरुन दिली माहिती
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून कलाबेन डेलकर आणि अभिनव डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर कलाबेन डेलकर यांना दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी घोषित करण्यात आल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले आहे.
मोहन डेलकर यांचा थोडक्यात परिचय
58 वर्षीय मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते येथून सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर यांचा राजकीय प्रवास काँग्रेसपासून सुरु होऊन भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष असा राहिला. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते.