मुंबई - शिवसेनेने भाजपसोबत यावं असे आवाहन रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केले आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये बैठक झाली होती. त्यामुळे शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर आठवलेंनी शिवसेनेला साद घातली आहे. विशेष म्हणजे आठवलेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही एनडीएसोबत येण्याचं आवाहन केलं आहे.
रामदास आठवले म्हणाले की, बाळासाहेबाचे स्वप्न पूर्ण व्हायचे असेल तर भीम शक्ती आणि शिवशक्ती एकत्र आली पाहिजे आणि आमची इच्छा आहे शिवसेनेने भाजपबरोबर एकत्र आले पाहिजे. राऊत आणि फडवणीस यांची काय चर्चा झाली, हे माहीत नाही मात्र सरकार स्थापनेची चर्चा झाली पाहिजे असे वाटत. शिवसेना जर सोबत येत नसेल तर राष्ट्रवादीने सोबत यावं. राष्ट्रवादी जर सोबत आली तर शरद पवार यांना मोठं पद मिळू शकेल. आणि महाराष्ट्राचा विकास देखील होईल. त्याचबरोबर नरेंद मोदी यांना देखील चांगला मित्र मिळेल. रामदास आठवले म्हणाले, की एनडीएमधून नुकताच बाहेर पडलेला अकाली दल पुन्हा एनडीएमध्ये सामिल होईल.
अमली पदार्थांच्या लिस्टमध्ये अभिनेत्यांची नावे येत नाहीत केवळ अभिनेत्रींची नावे कशी काय समोर येतात. ज्यांचे अमली पदार्थांमध्ये नाव आलं आहे आणि आरोप सिद्ध झाले तर त्याना अभिनय क्षेत्रात काम देऊ नये. जर काम दिलंच तर तेथील शूटिंग आम्ही बंद करू. पायल घोष हिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत रामदास आठवले म्हणाले, की काही वर्षापूर्वी तिच्यावर लैगिक अत्याचार झाले असल्याचे माहिती पायलने मला दिली आहे. याबाबत मी विश्वास नांगरे-पाटील आणि काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. पायल घोष प्रकरणात अजूनही कोणाला अटक किंवा चौकशीला बोलावेल गेले नाही. इतका वेळ लागत असल्याने पोलिसांच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहे. पायलला भीती वाटत असल्याने तिला पोलीस सुरक्षा मिळाली पाहिजे. जर तिचं काही बरं वाईट झालं तर त्याला जवाबदार मुंबई पोलीस असतील. अनुराग कश्यपला जर लवकर अटक नाही झाली नाही, तर आरपीआयतर्फे राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही आठवले यांनी दिली.
रामदास आठवले म्हणाले, आम्ही पोलीसाना सात दिवसांचा वेळ देतो नाही तर आंदोलन करू. अनुराग कश्यप जर दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. आमचे एक शिष्टमंडळ गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेणार आहे. मॅजिस्ट्रेट समोर देखील पायलची स्टेटमेंट होणार आहे
दिशा सालीयन प्रकरणावर रामदास आठवले म्हणाले, की दिशा सालीयन पार्टीच्या वेळी कशी आत्महत्या करू शकते. तिला कोणी खाली धक्का दिला असेल. याकडे मुंबई पोलिसांकडे लक्ष दिले नाही. मुंबई पोलिसांनी दिशा सालीयन केसची योग्य तपास करावा नाहीतर ही केस सीबीआयकडे द्यावी.
पायल घोष म्हणाली, की मी माझे करिअर सोडून न्याय मागण्यासाठी पुढे आलेली आहे. मला भीती वाटत आहे. लोकांनी अशा प्रकरणात पुढे आलं पाहिजे
पायलचे वकील नितीन सातपुते म्हणाले, की पोलिसांना आम्ही तपासासाठी वेळ दिलेला आहे पण पोलिसांनी लवकर काम करावं. पायल सोबत माझ्याही जीवाला धोका आहे म्हणून मी माझे स्वतःचे बाऊन्सर सोबत घेऊन फिरत आहे. पोलिसांनी आपल्या वर्दीचा अपमान करू नये.