मुंबई - मुंबई महापालिकेच्या चिटणीस विभागात मराठी विरुद्ध अमराठी वाद चांगलाच रंगला आहे. चिटणीस पदावरून अधिकारी न्यायालयात गेले असताना त्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. शिवसेनेचे मराठी प्रेम खोटे असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर भाजपाचे मराठी प्रेम बेगडी असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आल्याचे दिसत आहे.
तेव्हा भाजापवाले झोपले होते का ? -
मुंबई महापालिकेच्या चिटणीस पदावर संगीता शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला चिटणीस विभागात काम करणाऱ्या शुभांगी सावंत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने शुभांगी सावंत यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यानंतरही संगीता शर्मा यांनाच पदावर ठेवण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनेकडून मराठी अधिकाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव बोलत होते. यावेळी बोलताना, भाजपाने कोकण कन्या मराठी अधिकाऱ्यावर अन्याय आहे असे म्हटले आहे. हे मगरीचे अश्रू आहेत. भाजपचे जे नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये मराठी नगरसेवक किती, त्यांना मराठी बोलता येते का, भाजपाने किती मराठी उमेदवारांना उमेदवारी दिली. पालिकेत अनेक वरिष्ठ पदे इतर भाषिक अधिकाऱ्यांना देताना भाजपा झोपली होती का असे प्रश्न उपस्थित करत भाजपचे मराठी प्रेम हे बेगडी असल्याची टीका यशवंत जाधव यांनी केली आहे.
भाजपाने शिवसेनेला मराठीचा मुद्दा शिकवू नये. भाजपाला मराठीचा पुळका कधीपासून यायला लागला हे कळत नाही. भाजपच्या मराठी प्रेमाबाबत बोलायला नको. मराठीच्या न्याय हक्कासाठी शिवसेना ही एकमेव संघटना काम करते हे महाराष्ट्रातील नागरिकांना माहीत आहे. शिवसेना मराठी लोकांच्या हक्कासाठी काम करत आली आहे आणि यापुढे करत राहील. मराठी सोबतच अमराठी लोकांनाही शिवसेना सोबत घेऊन काम करत आहे असे यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. भाजपाने किती अमराठी लोकांना पदाधिकारी बनवेल आहे याचे आत्मपरीक्षण करावे. मराठीचा पुळका त्यांनी आम्हाला सांगू नये असे टोला जाधव यांनी लगावला आहे.
हे ही वाचा - राजनाथ सिंह यांच्या 'त्या' वक्तव्याबाबत सुशीलकुमार शिंदेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
त्यांनी यादी गोळा करावी -
यशवंत जाधव यांनी केलेल्या टीकेवर बोलताना, यादी काढून बघा अन्यथा यादी देण्याची आमची तयारी आहे. शिवसेनेनेने मराठीचे धडे दुसऱ्यांना देताना चंद्रिका केणी कोण होत्या, मुकेश पटेल कोण होते. प्रितीश नंदी कोण होते, संजय निरुपम कोण होते, प्रियांका चतुर्वेदी कोण होत्या, राजकुमार धूत कोण आहेत. अशी अनेक नावे देता येतील. यामुळे शिवसेनेने हे शोधण्याचा प्रयत्न करू नये. महापालिकेतील मराठी उमेदवारांची यादी त्यांनी गोळा करावी अन्यथा आम्ही त्यांना ती देऊ अशी प्रतिक्रिया भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.