मुंबई - दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू असून महापालिकेने कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीएचे मैदान मिळावे यासाठी बंडखोर आमदारांच्या गटाने केलेला अर्ज एमएमआरडीए'ने स्वीकारला असून शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते आरक्षित असल्याने तो अर्ज फेटाळण्यात आला आहे. यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी प्रतिक्रिया दिली असून शिवसेनेवर गंभीर टीका केली आहे.
BKCचे मैदान पार्किंगसाठी - यावेळी बोलताना किरण पावसकर म्हणाले की, "दसरा मेळावा हा आमचा शिवतीर्थावरच होणार. BKC चे मैदान हे आम्ही लाखोंच्या संख्येने येणार्या शिवसैनिकांची गैरसोय होऊ नये पार्किंगची व्यवस्थेसाठी घेतलेले आहे. आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरचं होणार." असही पावसकर यांनी म्हटले आहे.
ती काय वडापावची गाडी नाही - पुढं बोलताना ते म्हणाले की, "वारंवार शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून खालच्या भाषेतून बोललं जातं, येणार्या काळात त्यांना जसाश तसे नाही तर व्याजासह उत्तर दिले जाईल. वेदांता प्रकल्पासाठी वर्षभरापूर्वीपासून महाराष्ट्रासह गुजरातही प्रयत्न करत होते. ती काय वडापावची गाडी नाही सेनाभवनावरून उचलली आणि मातोश्रीला लावली."
शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा - दरम्यान, बंडखोर गटाच्या आमदारांचा अर्ज एमएमआरडीएने स्वीकारल्याने त्यांना मैदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेने बीकेसीतील ज्या मैदानासाठी अर्ज केला होता, ते आधीच आरक्षित आहे. त्यामुळे शिवाजी पार्क दोन्ही गटांना नाकारण्यात आल्यास शिंदे गटाला बीकेसी'चा पर्याव उपलब्ध असेल, हे स्पष्ट झाले आहे. गेली अनेक वर्षे नियमितपणे शिवसेनेतर्फे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यात येत आहे.