मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या अभिरुप विधानसभेत भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. मुंबईत शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. लालबाग, परळ शिवडी भागातील सेना कार्यकर्त्यांनी भारतमाता सिनेमागृहासमोर जोरदार निदर्शने केली. शिवसेना स्टाईलने घोषणाबाजी देत, परिसर दणाणून सोडला. दरम्यान, नितेश राणे यांचा प्रतिकृती पुतळा जाळून निषेधही करण्यात आला.
नितेश राणेंचे आक्षेपार्ह विधान
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला. भाजपने यावर आक्षेप घेत, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना घेराव घातला. याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली. या कारवाईचा निषेधार्थ विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाजावर बहिष्कार टाकत भाजप आमदारांनी विभानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरुपी विधानसभा भरवली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना 'पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचेच वंशज आहेत का? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल,' असे आक्षेपार्ह विधान केले होते.
शिवसेना स्टाईलने घोषणाबाजी
मुंबईतील सेना कार्यकर्त्यांनी राणे यांच्या या वक्तव्यानंतर आक्रमक पवित्रा घेत, भारतमाता सिनेमागृहासमोर जोरदार निदर्शने केली. शिवसेना स्टाईलने नितेश राणे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेचा यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळला. दरम्यान, पोलीस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटपटीमुळे काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
'तोंड सांभाळून बोला'
आमदार अजय चौधरी यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे यांची माफी मागावी आणि इथून पुढे बोलताना तोंड सांभाळून बोलावे, शिवसेना हे खपवून घेणार नाही, असा इशारा अजय चौधरी यांनी नितेश राणे यांना दिला आहे.
नितेश राणे यांची सारवासारव
'विधानसभेबाहेर माझ्या कालच्या भाषणामध्ये मी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता, तो बर्याच जणांनी चुकीच्या पद्धतीने घेतला. जर भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेतो,' असे ट्विट नितेश राणे यांनी करत या प्रकरणात सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.