मुंबई -अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी शर्जिल उस्मानी याने एल्गार परिषदेत केलेल्या भाषणाविरोधात, पुणे येथे दाखल केलेल्या एफआयआरला आव्हान देत सदर एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
काय आहे प्रकरण -
30 जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे एल्गार परिषद हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठातील तरुण शर्जील उस्मानी याने भाषण देताना भारतीय संघराज्य विरोधात व हिंदू समाजाविरोधात आपत्तीजनक व भडकाऊ विधान केले होते. शर्जील उस्मानी याने आपल्या भाषणात "आजचा हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे. 14 वर्षाच्या जुनेदला चालत्या ट्रेनमध्ये 31 वेळेस चाकूचे वार करून मारले जात असताना त्यांना कोणी थांबवत नाही. अशाप्रकारे लिंचींग करून हत्या करणारी ही लोक घरी जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्यात येऊन मिसळतात आणि आणखी दुसऱ्या कोणाची हत्या करतात, असे वक्तव्य केले होते.
कोणी केली होती तक्रार -
2 फेब्रुवारी 2021 रोजी, स्वारगेट पोलीस ठाणे, पुणे यांनी उस्मानीविरोधात कलम 153 अ (धर्म, वंश, स्थळाच्या आधारे वेगवेगळ्या गटांमधील तेढ वाढविणे) याअंतर्गत एफआयआर नोंदविला. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांनी ही तक्रार दाखल केली होती. गावडे हे अभाव्हीपचे माजी सदस्य आहेत. पोलीस तक्रारीत उस्मानी यांनी 'हिंदू समाज', 'भारतीय न्यायव्यवस्था' आणि 'संसद' यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप करण्यात आला होता.
काय आहे शर्जिलचे म्हणणे -
उस्मानी यांनी तक्रारीतील सर्व आरोप नाकारले आहेत. शर्जिलचे म्हणणे आहे की त्यांनी भाषण करण्यापूर्वी किंवा नंतर घटनास्थळी असंतोषजनक प्रतिक्रिया किंवा अस्वस्थता प्रेक्षकांमध्ये दिसून आली नव्हती. अशा प्रकारच्या एफआयआर समाजातील जातीय सलोख्याला बिघडवण्यासाठी आणि फौजदारी न्यायव्यवस्थेचा दुरूपयोग असून बोलण्याच्या स्वातंत्र्याला आळा घालण्याचे प्रयत्न आहेत, असे शर्जिल म्हणाला. शर्जिल उस्मानीच्या वकील अदिती सक्सेना यांनी दाखल केलेल्या याचिकेत उस्मानी म्हणाले आहेत, की 30 जानेवारी 2021 रोजी पुण्यात भीमा कोरेगावच्या लढाईच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शांततापूर्ण मेळाव्यात त्यांनी भाषण केले. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोलसे पाटील, लेखक अरुंधती रॉय आणि पत्रकार प्रशांत कनोजिया हे यांच्यासारखे ज्येष्ठ प्रतिष्ठित कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच एफआयआर हा निरुपयोगी, निराधार आहे आणि भाषणातून निवडलेल्या काही संदर्भांच्या आधारे "संदर्भ बाहेर" नोंदविण्यात आला आहे , असे या याचिकेत म्हटले आहे.
हेही वाचा - शरजील इमाम समर्थन प्रकरणी उर्वशी चुडावालासह 50 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा