मुंबई - विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये लाथाडीमुळे त्यावेळी काँग्रेसच्या एका माजी प्रदेशाध्यक्षांनी माझे तिकीट कापले होते, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे विधान परिषदेमधील गटनेते शरद रणपिसे यांनी आपल्याच पक्षातील माजी प्रदेशाध्यक्षांवर केला. आपल्याला त्यावेळी डावलून इतर लोकांना उमेदवारीसाठीचा एबी फॉर्म सुद्धा दिला होता. मात्र, त्यावेळी मला राम प्रधान यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घालून दिली आणि सर्वांना डावलून त्यावेळी सोनिया गांधीजी यांनी मला उमेदवारी दिल्याची माहितीही रणपिसे यांनी यावेळी दिली.
विधान परिषदेत आज बिहार व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी विधान परिषद सदस्य राम प्रधान, विनायकराव पाटील तसेच संदेश कोंडविलकर या माजी सदस्याचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावेळी रणपिसे यांनी राम प्रधान यांचे आणि आपले संबंध सांगत असताना आपल्याच एका माजी प्रदेशाध्यक्षावर आपले तिकीट कापले असल्याचा आरोप केला. काँग्रेसमधील त्यावेळी असलेल्या लाथाडीमुळे मला त्यावेळी डावलले गेले होते. मात्र, राम प्रधान यांनी मला बोलावून घेऊन माझ्या अगोदर ज्या लोकांना एबी फॉर्म दिला होता. त्यांना बाजूला करून मला सोनिया गांधी यांनी उमेदवारी देण्याचे जाहीर केले अशी माहिती दिली. राम प्रधान यांचा एका निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र, हा पराभव नव्हता, तर त्यांना जाणीवपूर्वक काही लोकांनी मिळून पाडले होते असाही आरोप शरद रणपिसे यांनी यावेळी केला.
शरद रणपिसे यांची विधानपरिषदेतील तिसरी टर्म असून ते विधान परिषदेवर सुरुवातीला सदस्य म्हणून येण्याच्या कालावधीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख हे कामकाज पाहत होते. रणपिसे यांनी आज राम प्रधान यांच्या शोक प्रस्ताव यादरम्यान आरोप करताना देशमुख यांच्या नावाचा कुठेही उल्लेख केला नाही. केवळ त्यावेळच्या प्रदेश अध्यक्षानी आपल्याला डावलले होते असे विधान केले.