मुंबई - महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात भेट घेतली.
या भेटी दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीबाबत मोलाचा सल्ला दिला आहे. राज्यातील महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद होणार नाहीत, यासाठीची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून आपण घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
हेही वाचा - मुंबईत जोरदार पाऊस; येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता
महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आज पवार यांनी मुख्यमंत्र्यांची दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात भेट घेतली. या भेटीदरम्यान पवारांनी सरकार म्हणून कोणते निर्णय घेत असताना आपल्या सहकारी पक्षांना विश्वासात घेणे आवश्यक असते. अन्यथा त्यामुळे गैरसमज पसरतात. राज्यात जाहीर करण्यात आलेल्या नवीन लॉक डाऊनमुळे अनेक मंत्री आणि नेते नाराज झाले असून ती नाराजी आपण दूर करावी, त्यांना विश्वासात घ्यावे, असा सल्लाही पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला असल्याचे सांगण्यात येते.
राज्यात लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विचारात घेतले गेले नाही. त्यातच आघाडीतील एकत्र असलेल्या पक्षाच्या नेत्यामध्ये त्यावरून मतभेद समोर आले. नागरिकांना 2 किमी ची हद्द या निर्णयाशी काँग्रेसने आपली असहमती दाखवली, तर राष्ट्रवादीचे गृहमंत्री आलेले अनिल देशमुख यांना देखील या निर्णय प्रक्रियेची भणक लागू दिली गेली नसल्याने राष्ट्रवादीने आपली नाराजी पवारांच्या माध्यमातून व्यक्त केली होती. त्यामुळेच या भेटीपूर्वी पवारांनी काल दूरध्वनीवरुन मुख्यमंत्र्यांसोबत एकदा चर्चा केली होती.
हेही वाचा - हे सरकार साधु-संत आणि महंतांच्या विरोधात आहे का? आमदार विनायक मेटेंचा सवाल
मागील काही दिवसांपासून आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये काँग्रेसला विचारातच घेतले जात नाही, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्याठीची नाराजी काँग्रेसच्या नेत्यांकडून वेळोवेळी व्यक्त करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मागील दीड आठवड्यांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती.
तसेच राज्यातील जनता कोरोणाच्या संकटात सापडले असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने न्याय ही योजना राबवावी, अशी मागणी या भेटीदरम्यान करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही ही मुख्यमंत्र्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर ही आज पवार आणि मुख्यमंत्र्यांनी मध्ये चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते. आज तब्बल एक तास चाललेल्या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील कोरोणाच्या परिस्थितीवर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत असले तरी आघाडीतील नेते आणि त्यांची नाराजी हाच प्रमुख विषय या बैठकीत होता, असेही बोलले जात आहे.