मुंबई - सत्तेचा उपयोग लोकांच्या कामासाठी करायचा असतो. मात्र, केंद्रातील सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. केंद्रातील भाजप सरकार सत्तेचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
- सूडबुद्धीने कारवाई -
भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी सरनाईक यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना राज्यात स्थापन झालेल्या आघाडी सरकारला सर्वाचा पाठिंबा मिळत आहे. आपली सत्ता काही केल्या येत नसल्याने भाजपमध्ये नैराश्य आले आहे. त्यामुळे त्याचा संताप या माध्यमातून व्यक्त केला जात आहे, असे पवार म्हणाले. सत्तेचा दुरुपयोग केला जातोय. राज्यात सत्ता येणार नाही म्हणून अशी कारवाई केली जात असल्याचे पवार म्हणाले.
- भाजपवर टीका -
भाजपचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील आघाडी सरकार दोन महिन्यात पडेल असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना दानवे यांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास चांगला आहे हे आज माहिती पडले, असा टोला पवार यांनी लगावला. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार पडल्यावर यावेळी आम्ही रात्रीअपरात्री शपथ न घेता योग्य वेळी शपथ घेऊ असे म्हटले आहे. यावर बोलताना माणसांनी आशा ठेवावी. मागेही ते पुन्हा येईल बोलले होते. लोकं हे सर्व लक्षात ठेवतात, असे पवार म्हणाले.
- राजकारण करू नये -
कोरोना विषाणूबाबत पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटची लस येत आहे. त्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. यावर बोलताना लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी. पंतप्रधान पुण्याला जात आहेत हे चांगले आहे. मोठे संकट मानवावर येते तेव्हा राजकारण करणे चुकीचे असल्याचे पवार म्हणाले.
हेही वाचा - ईडी कारवाई LIVE : प्रताप सरनाईक-संजय राऊत भेट; राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न - संजय राऊत
हेही वाचा - प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई: 'केंद्रीय संस्थांचा राजकीय द्वेषासाठी गैरवापर'