मुंबई : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असताना दुसऱ्या लाटेत किती नागरिकांमध्ये अँटिबॉडी विकसित झाल्या हे जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिका आता पाचवा सेरो सर्व्हे करणार आहे. येत्या पंधरा जुलैपासून सरसकट सेरो सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत चार सेरो सर्व्हे करण्यात आलेले आहेत.
याआधी करण्यात आलेले सर्व्हे
मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पालिका आणि काही संस्थांनी केलेल्या सेरो सर्वेक्षणात घेण्यात आलेल्या रक्तातील नमुन्यांपैकी झोपडपट्टी भागात ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागात १६ टक्के नमुन्यांमध्ये अँटिबॉडी आढळून आल्या होत्या. झोपडपट्टीतील रहिवाशांमध्ये प्रतिकारशक्ती वाढल्याचे यातून दिसून आले होते. पहिल्या फेरीत अंदाजित केलेल्या ८ हजार ८७० पैकी एकूण ६ हजार ९३६ नमुने संकलित करण्यात आले होते. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर-उत्तर, एम-पश्चिम आणि एफ-उत्तर या ३ विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले होते. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्स-कोविड आयजीजी अँटिबॉडीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सर्व्हेच्या दुसऱ्या टप्प्यात आयसीएमआरच्या सूचनेनुसार मुंबईमधील एफ-उत्तर(माटुंगा), एम-पश्चिम(चेंबूर) आणि आर-उत्तर(दहिसर) विभाग कार्यालयांच्या हद्दीत सेरो सर्वेक्षण करण्यात आले. १३ ते २८ ऑगस्टदरम्यान केलेल्या या सर्वेक्षणात ५,८४० जणांची तपासणी करण्यात आली. यात झोपडपट्टी भागामध्ये सरासरी सुमारे ४५ टक्के व बिगर झोपडपट्टी भागामध्ये सुमारे १८ टक्के याप्रमाणे रक्तातील अँटिबॉडी आढळून आल्या.
१५ जुलैपासून पाचवा सर्व्हे
तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात १० हजार १९७ नागरिकांच्या रक्ताचे नमुन तपासण्यात आले. यामध्ये मुंबईतील ३६.३० टक्के नागरीिकांमध्ये अँटीबॉडी आढळल्या. त्यानंतर १ एप्रिल ते १५ जून २०२१ दरम्यान पालिकेने सर्व वॉर्डांमध्ये चौथे सेरो सर्वेक्षण केले. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ५० टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये प्रतिपिंडे (अँटिबॉडी) आढळल्या. या सर्वेक्षणाचा निष्कर्ष दिलासा देणारा ठरल्यानंतर पालिका आता १५ जुलैपासून पाचवे सर्वेक्षण करणार आहे. सर्व वॉर्डांमध्ये सरसकट सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली आहे.
हेही वाचा - Delta plus variant : डेल्टा प्लसची लागण झालेले 21 पैकी 20 रुग्ण बरे, चिंतेची गरज नाही - राजेश टोपे