मुंबई - आज सकाळपासूनच शेअर बाजारात चांगली खरेदी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 287.36 अंकांनी वाढून 45,714.33 वर तर निफ्टी 73.20 अंकांनी वाढून 13,428.95 वर बंद झाला. व्यापारादरम्यान सेन्सेक्सने 45,728.85 आणि निफ्टीने 13,435.35 पर्यंत मजल मारली होती. जो दोन्ही निर्देशांकांमधील सध्याच्या काळातील सर्वोच्च उच्चांक आहे.
बाजारात ऑटो आणि बँकिंग सेक्टरमध्ये गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. निफ्टी बँक निर्देशांकही 30,264 च्या पातळीवर व्यापार करत आहे. त्याचबरोबर निफ्टी मेटल निर्देशांकही किंचित घसरणीसह व्यापार करत आहे. बाजारात चांगली वाढ झाल्यामुळे बीएसईमधील सूचीबद्ध कंपन्यांची एकूण बाजारपेठ 182.13 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.
दरम्यान, आज संयुक्त शेतकरी संघर्ष संघटनेने भारत बंद आंदोलन पुकारले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. तसेच दिल्लीच्या सीमावर्ती भागात ठिय्या दिला आहे. याला पाठिंबा दर्शवण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न समित्यांपासून सर्व आस्थापने बंद ठेवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. देशभरात पुकारलेल्या बंदचा शेअर मार्केटवर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र अद्याप शेअर मार्केटची परिस्थिती पूर्वीपेक्षा वधारल्याची स्थिती आज पाहायला मिळत आहे.