मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावण विषयक कामांची दखल संयुक्त राष्ट्र संघाच्या ( United Nations ) अखत्यारीतील संस्थेने घेतली आहे. या संस्थेने 'वृक्ष नगरी' अर्थात 'Tree City' चा 'वर्ष २०२१' साठीचा बहुमान मुंबईला ( Tree City Mumbai 2021 ) घोषित केला आहे. असा बहुमान मिळवणारे मुंबई हे भारतातील दुसरे शहर ठरले आहे. या गौरवामुळे 'स्वप्न नगरी' अशी ओळख असणाऱ्या मुंबई शहराला आता 'वृक्ष नगरी' ( Tree City ) अशी एक नवी ओळख मिळाली आहे. जागतिक स्तरावरील या गौरवाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले आहे.
आदित्य ठाकरेंनी केले कौतुक : बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (सोमवारी) संपन्न झालेल्या एका विशेष बैठकीत दरम्यान राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीतील 'अरबोर डे फाऊंडेशन' यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या सन्मान पत्राची प्रत दिली आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक कामांचे कौतुक केले.
वनीकरणात जागतिक 'नेटवर्क'मध्ये : संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अखत्यारीतील 'अरबर डे फाऊंडेशन' चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन लेंब यांनी या मुंबई शहराच्या बहुमानानिमित्त लिहिलेल्या विशेष पत्रात मुंबई शहराचे अभिनंदन केले आहे. तसेच मुंबई शहर हे आता शहरी आणि सामुदायिक वनीकरणात आघाडीवर असलेल्या महत्त्वाच्या जागतिक 'नेटवर्क'मध्ये सहभागी झाले आहे. हा अत्यंत प्रतिष्ठेचा दर्जा मिळवल्याबद्दल त्यांनी मुंबई शहराचे आणि पर्यायाने मुंबईकरांचे अभिनंदन केले आहे.
मुंबई हे देशातील दुसरे शहर : मुंबई शहराच्या या बहुमानाने बद्दल अधिक माहिती देताना उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उभारण्यात आलेली मियावाकी जंगले, नियमितपणे करण्यात येणारे वृक्षारोपण, वृक्षांची घेण्यात येणारी शास्त्रशुद्ध निगा, जनजागृती, संबंधित संसाधनांचे वाटप अशा विविध मानकांच्या आधारे जगभरातील शहरांचे मूल्यमापन करण्यात येऊन मुंबईची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी भारतातील केवळ हैदराबाद या एकाच शहराला हा बहुमान लाभला आहे. त्यामुळे 'वृक्ष नगरी'चा बहुमान मिळवणारे मुंबई हे देशातील दुसरे शहर ठरले आहे, अशी माहिती परदेशी यांनी दिली.
हेही वाचा - Maharashtra Ministry Restictions : निर्बंधमुक्त राज्यातून मंत्रालयाला वगळले?