मुंबई - शीना बोरा हत्याकांड प्रकरणात आरोपी संजीव खन्नाला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. 1 लाखाच्या जातमुचलक्यावर काही अटी व शर्तींवर उच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला. इंद्राणीनंतर जवळपास साडेसहा वर्षांनंतर संजीव खन्नाचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मागील महिन्यात या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला देखील सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
राहुल मुखर्जीने केले धक्कादायक खुलासे - संजीव खन्ना आणि श्यामवर रायच्या मदतीने इंद्राणीने आपली मुलगी शीना बोराची हत्या केल्याचा आरोप संजीव खन्नावर आहे. या प्रकारातील प्रमुख साक्षीदार राहुल मुखर्जी यांची देखील मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात साक्ष सुरू आहे. यात राहुल मुखर्जीने या प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे देखील केलेले आहे.
काय आहे प्रकरण शीना बोरा हत्या प्रकरण - इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचे नाव शीना बोरा होते. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितले जाते. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद होती.