मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रित करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
शपथविधीला सोहळ्याचे निमंत्रण पंतप्रधान मोदींना देण्यात येणार का, असे विचारले असता संजय राऊत यांनी प्रत्येकाला निमंत्रण देणार असल्याचे सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकासआघाडीमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची 28 नोव्हेंबरला शपथ घेणार असल्याचे आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. महाविकासआघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरेंची निवड केल्याचे पत्रही राज्यपालांना देण्यात आलेले आहे.
हेही वाचा-अजित पवारांनी सिल्व्हर ओकमध्ये शरद पवारांची घेतली भेट ; चर्चा गुलदस्त्यात
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत दिली होती. त्यापूर्वीच राज्यातील फडणवीस सरकार कोसळले. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
हेही वाचा-'मातोश्री' ते 'वर्षा' ; ठाकरेंचा किंगमेकर ते किंगपर्यंतचा प्रवास
शिवसेना आणि भाजपची सुमारे तीस वर्षांची युती तुटली आहे. तर ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच थेट पदग्रहण करणार आहे.