मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी (Shivsena Workers) मुंबई विमानतळावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. संजय राऊत यांच्या स्वागताला हजारो शिवसैनिक मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना राऊत यांनी किरीट सोमैया (Kirit Somaiya) आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. सोमैया यांचा भ्रष्टाचार समोर आलेला आहे, त्यांच्याकडे आता विरोध करायला एकही पुरावा राहिलेला नाही. त्यांच्याकडे आता उत्तर राहिलेले नाही, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन - ईडीने मालमत्ता जप्त केल्यानंतर संजय राऊत हे आज पहिल्यांदा मुंबईत आले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांकडून त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, सुनील प्रभू आणि खासदार विनायक राऊत हे देखील उपस्थित होते. योद्धा नावाच्या फलकांसह संजय राऊतांच्या समर्थनात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. मुंबईत ठिकठिकाणी संजय राऊत यांच्या फोटोसह पोस्टरबाजी करण्यात आली होती. मुंबई विमानतळ ते भांडूप अशी रॅली काढून शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनावर भाजप नेत्यांनी मात्र सडकून टीका केली आहे.
संजय राऊत यांची भाजपावर जोरदार टीका - संजय राऊत मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. राऊत म्हणाले की, भाजपा नेते किरीट सोमैयांचा भ्रष्टाचार पुराव्यासह बाहेर काढला. सोमैयांकडे आता उत्तर असूच शकत नाही, सोमैयांच्या विक्रांत घोटाळ्यावर आता देशात चर्चा सुरू झाली आहे. विक्रांतसाठी मिळवलेल्या पैशातून सोमैयांनी मनी लाँड्रिंग केले, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
पुढची २५ वर्ष महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही - आमच्यावर कितीही कारवाया करा, आम्ही महाविकास आघा़डी म्हणून तिघेही एकत्र आहोत. पुढची २५ वर्ष महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही. कुठल्याही संकटाला एकजुटीने सामोरे जाणार आहोत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचे संकटही आमच्यासाठी संधी आहे. तसेच शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीतून महाविकास आघाडी सरकार एकत्र आहे, हे स्पष्ट झाल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.
ईडीने जप्त केली होती संजय राऊत यांची मालमत्ता - शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut Property Seize By ED) यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. राऊत यांची ११.१५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. याबरोबर ८ भूखंड आणि मुंबईच्या दादर परिसरातील एक फ्लॅट देखील ईडीने जप्त केले होते. 1034 कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली होती. याच प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली होती. ही कारवाई झाली त्यावेळी संजय राऊत हे दिल्लीत होते. आज ते मुंबईत दाखल झाले आहेत.
काय आहे प्रकरण? - आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सोमैया यांनी पैसे जमा केले होते. भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विक्रांत'चा ६० कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला होता. 'आयएनएस विक्रांत' या युद्धनौकेने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. १९६१ मध्ये नौदलात दाखल झालेल्या “आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ६० कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केली गेली होती.
किरीट सोमैया अडचणीत - शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे नेते किरीट सोमैया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्याकरता जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयामध्ये पोहोचले नसल्याची बाब माहिती अधिकारांअंतर्गत समोर आलेली आहे. आरटीआय कार्यकर्ते वीरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याविषयी ही माहिती मागवली होती.
सोमैया पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल - किरीट सोमैया आणि त्यांचे पुत्र नील सोमैया यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी गोळ्या केलेल्या निधीत झालेल्या अपहार प्रकरणी माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली असून या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी भेटीसंदर्भातील माहिती दिली. यावेळी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी.पी. देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावरील कारवाईच्या मुद्यावरही प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांच्यावर अन्याय झाला असून या कारवाईची गरजच काय होती? असा सवालही पवारांनी उपस्थित केला. तसेच भाजपाशी आमचा काहीही संबंध नसून राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र भाजपशी लढणार असल्याचेही ते म्हणाले.