मुंबई - राज्यात भाजप सेना यांच्यातील युतीत कटुता अधिक वाढण्याची चिन्हे दिसत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर टीका करताना केंद्रातील सरकारला राज्यात सत्ता नियंत्रीत करू देणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच राष्ट्रपती राजवट लावल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून अधिक काळ राहून सत्तेची सूत्रे हलवायची, हा सरकारचा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा... राष्ट्रपती राजवट आणि शरद पवार, 'असा' आहे इतिहास
भाजप आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्ष आता टोकाला जाताना दिसत आहे. एकीकडे भाजपने मुख्यमंत्री पदाची तडजोड मान्य नसल्याचे सांगतल्या नंतर शिवसेनेनेही मागे न हटण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. शनिवारी राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि राज्यातील जनतेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. केंद्रातील सत्तेला राज्यातील सत्ता नियंत्रित करायची असेल तर तसे होऊ देणार नाही. राष्ट्रपती राजवटीच्या आडून राजकारण करण्याचा सरकारचा डाव असून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून अधिक काळ पदावर राहून सत्तेची सूत्रे हलवायची आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा... 'महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा डाव, राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे ;
- महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लावून सत्ता करायची असेल तर तो शिवाजी महाराजांचा आणि राज्यातील जनतेचा अपमान असेल
- दिल्लीपुढे शरद पवार झुकले नाहीत आणि ठाकरे पण झुकणार नाहीत.
- भाजपकडे बहुमत असेल तरच फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील.
- काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून अधिक काळ राहण्याचा आणि सूत्रे हलवण्याचा डाव आहे. तसेच हा महाजनादेशाचा अपमान.
- मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागेल.
- काळजीवाहू सरकार महाराष्ट्रात नक, असे सर्व प्रमुख राजकीय पक्षांना वाटते. यासाठी हालचाली सुरू.