मुंबई - देवेंद्र फडणवीसांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका केली. यामध्ये शिवसेनेने नरेंद्र मोदींबाबत खालच्या दर्जात टीका केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. तसेच सत्तास्थापनेची चर्चा थांबण्यास शंभर टक्के शिवसेनाच जबाबदार असल्याचाही आरोप फडणवीस यांनी केला होता.
यावर बोलताना, संजय राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्या कितीतरी पक्षांसोबत भाजपने अनेक राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे शिवसेनेसारख्या प्रखर राष्ट्रवादी पक्षाबाबत असे वक्तव्य करणे हे चुकीचे आहे. तसेच नरेंद्र मोदींबाबत किंवा अमित शाह यांच्याबाबत शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारची टीका झाली नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
जर मुख्यमंत्री असे म्हणत असतील, की त्यांचे पुन्हा एकदा सरकार येईल, तर त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे बहुमत आहे, तो नक्कीच सरकार बनवू शकतो. मात्र, त्याचवेळी मी हेही सांगेल की शिवसेनेने जर ठरवले, तर सेनाही सरकार स्थापन करू शकते आणि सेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
हेही वाचा : शरद पवार मुंबईतील निवासस्थानी दाखल; राजकीय घडामोडी बदलण्याची शक्यता