मुंबई - हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा काही जणांचा डाव आहे. मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप हे करीत आहे. महाराष्ट्रातील काकड आरत्या यानिमित्ताने बंद झाल्या. हे हिंदूंचे नुकसान आहे. मनसेचा हिंदू - हिंदू मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. मात्र, हिंदूंनी आता संयम राखावा, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले ( Sanjay Raut Criticizes Mns ) आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राला काकड आरतींची अत्यंत जुनी परंपरा आहे. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या देवस्थानांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. पण, आता भोंग्यांवरील जबरदस्तीच्या सक्तीमुळे पहाटेच्या काकड आरतीवरही बंधन आले आहेत. आज ( 4 मे ) महाराष्ट्रातील अनेक मोठ्या देवस्थानांमध्ये काकड आरती झाली नाही. याची नाराजी अनेक हिंदू भक्तांनी व्यक्त केली. हा धार्मिक वाद असल्याचेही राऊतांनी सांगितले आहे.
'भाजपने राज ठाकरेंचा बळी दिला' - भाजपला जी गोष्ट करणे शक्य होत नाही. ती गोष्ट ते छोट्या पक्षांच्या माध्यमातून करतात. छोट्या पक्षांचा भाजप सातत्याने बळी देते. आता हिंदूंमध्ये फूट पाडून भाजपने राज ठाकरे यांचाही बळी दिला आहे. भाजपने राज ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे.
हेही वाचा - Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, "मर्सडीज बेबीला संघर्ष..."