मुंबई - विधान परिषदेवर १२ सदस्यांच्या नियुक्तीवरुन न्यायालयाने राज्यपालांना फटकारल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊतांनी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. बालाकोटवर सर्जिकल स्ट्राइक केला होता, तेव्हा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळा अभ्यास करुन २४ तासांत निर्णय घेतला होता. आता १२ आमदारांवर एवढे कुठले संशोधन सुरु आहे? कोणाला पीएचडी करायची असेल तर ती देखील करुन घ्या, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
तौक्ते चक्रीवादळ -
नुकसान झाले तेव्हा नरेंद्र मोदींनी तातडीने गुजरातला एक हजार कोटी देऊ केले. महाराष्ट्राचा आक्रोश महाराष्ट्राची वेदना तुम्हाला कळत नाही असेही राऊत यावेळी म्हणाले.
तर भाजपने चक्काजाम केले असते -
रामदेव बाबांनी केलेले वक्तव्य जर कोणी दुसऱ्याने केले असते, तर भाजपने रस्त्यावर उतरून चक्काजाम केला असता अशी टीकाही राऊतांनी रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावर केली.
अशी शंका नाना पटोलेंना का आली -
काँग्रेसशिवाय सरकार आहे, अशी शंका नाना पटोलेंना का यावी? हे सरकार बनवताना आम्ही आघाडीवर होतो. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी सुरुवातीपासूनच आमच्या चर्चा सुरु होत्या. शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा अन्य नेते असतील. त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीने, सहकार्यानेच चालले आहे याचे विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झालेले नाही, असे यावेळी त्यांनी सांगितले.